IND vs SL Asian Games 2026 Semi Final Schedule Rain Rules: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पुरूष संघाचे क्रिकेट सामने सुरू झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या संघाने सुवर्णपदक जिंकलं आणि आता पुरूष संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारताच्या पुरूष संघाने रँकिंगमुळे थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. पण पावसामुळे अफगाणिस्तान संघाविरूद्धचा उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला. त्यानंतर पुन्हा एकदा रँकिंग चांगलं असल्यामुळे टीम इंडिया उपांत्य सामन्यात पोहोचली. आता उपांत्य फेरीतील सामना कधी सुरू होणार, जाणून घेऊया.
हवामानामुळे २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पाऊस आणि ओल्या मैदानामुळे, एकही चेंडू न टाकताच सर्व उपांत्यपूर्व सामने रद्द करावे लागले. परिणामी, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी त्यांच्या चांगल्या सरस टी-२० रँकिंगच्या आधारे उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंकेशी १ ऑक्टोबर रोजी होईल.
१ ऑक्टोबरला भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता खेळवला जाईल. याचा अर्थ सामन्याची नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच ९.३० वाजता होईल. पण जपानमधील स्थिती पाहता पावसामुळे हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा सामना पाहायला मिळणार का, याबाबत चाहते शंका व्यक्त करत आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य सामनाही जर पावसामुळे रद्द झाला, तर भारतीय संघ कोणताही सामना न खेळताच अंतिम फेरीत स्थान मिळवेल. नियमांनुसार, सामना रद्द झाल्यास ज्या संघाचे रँकिंग अधिक चांगले असते, तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो. भारतीय संघ टी-२० रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे, तर श्रीलंकेचा संघ नवव्या स्थानी आहे, म्हणजेच उपांत्य सामना रद्द झाल्यास भारत थेट अंतिम फेरीत पोहोचेल. तर श्रीलंकेचा संघ कांस्यपदकाचा सामना खेळेल.
अंतिम फेरीत स्थान निश्चित झाल्यामुळे भारताचे किमान रौप्य पदक निश्चित होईल. त्यानंतर, जर अंतिम सामना झाला आणि भारत त्यात विजयी झाला, तर देशाला या आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी एक सुवर्णपदक मिळेल. दुसरा सेमीफायनल सामना बांगलादेश आणि पाकिस्तान संघांमध्ये होणार आहे. हा सामनाही जर पावसामुळे रद्द झाला तर रँकिंगच्या आधारे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. त्यामुळे दोन्ही सेमीफायनल सामने रद्द झाले, तर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सुवर्णपदकाचा अंतिम फेरीचा सामना होऊ शकतो.
