गॉल : श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे १५ ऑगस्टपासून सुरू होणार्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ तीन डावखुर्या फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता असल्याचे संकेत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने गुरुवारी दिले. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मानव सुथार या तिघांच्या वेगवेगळ्या शैली भारताच्या गोलंदाजीला अधिक धार देऊ शकतात, असे मॉर्केल म्हणाला.
गॉलची खेळपट्टी फिरकीला साथ देण्याची शक्यता लक्षात घेता भारतासाठी तीन फिरकीपटूंचा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो. कुलदीप डावखुरा मनगटी फिरकीपटू असून त्याच्या चेंडूला अधिक वळण मिळते. जडेजा अचूक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, तर सुथार पारंपरिक पद्धतीने चेंडूला उसळी देत फलंदाजांना मोठे फटके मारण्यास भाग पाडू शकतो. या तिघांमधील हेच वैविध्य भारतासाठी निर्णायक ठरू शकते, असे मॉर्केलला वाटते.
‘‘तिन्ही गोलंदाज डावखुरे असले तरी त्यांच्या गोलंदाजीच्या पद्धतीत मोठा फरक आहे. त्यामुळे तिघांना एकत्र खेळवण्यात कोणतीही अडचण नाही. कुलदीपकडे अनुभव आणि दर्जा असून तो संघासाठी आक्रमक पर्याय आहे. सुथार चेंडूला तुलनेने अधिक वळण देतो, तर जडेजा अचूकतेच्या जोरावर फलंदाजांवर दबाव निर्माण करू शकतो. त्यामुळे परिस्थितीनुसार कर्णधार शुभमन गिल या तिघांचा योग्य वापर करेल,’’ असे मॉर्केलने नमूद केले. भारताला २० बळी मिळवून देण्याची क्षमता या तिन्ही फिरकीपटूंमध्ये असल्याचा विश्वासही मॉर्केलने व्यक्त केला.
गॉलमधील खेळपट्टीचा इतिहास पाहता फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतात. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली असली, तरी जसजसा सामना पुढे जातो तसतसे फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता वाढते. मॉर्केलच्या मते, भारताची फिरकी गोलंदाजी ही केवळ बचावात्मक नाही, तर अत्यंत आक्रमक शस्त्र ठरू शकते. ‘‘परिस्थितीचा मानसिकदृष्ट्याही सामना करावा लागणार असून फलंदाजांनी संयम राखणे आणि गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर सातत्याने मारा करणे आवश्यक असेल,’’ असे मॉर्केलने सांगितले.
वेगवान गोलंदाजांसमोर उष्णतेचे आव्हान
* भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा अनुभवी मोहम्मद सिराज सांभाळेल. त्याला साथ देण्यासाठी प्रसिध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यापैकी एकाची निवड होणे अपेक्षित आहे.
* दोघांकडेही कसोटी क्रिकेटचा तुलनेने कमी अनुभव असला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कठीण परिस्थितीत त्यांनी गोलंदाजी केली आहे, असे मॉर्केलने सांगितले. श्रीलंकेतील उष्ण आणि दमट हवामान हे मात्र वेगवान गोलंदाजांसाठी मोठे आव्हान असेल, असे मॉर्केलला वाटते. * ‘‘श्रीलंकेत वापरल्या जाणार्या कुकाबुरा चेंडूचा टणकपणा साधारण २० ते ३५ षटकेच टिकतो. त्यामुळे त्या षटकांनंतर वेगवान गोलंदाजांनी आपली रणनीती बदलणे आणि दबाव कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या तंदुरुस्तीचा श्रीलंकेच्या उष्णेतेत निश्चित कस लागेल. मात्र, आमचे गोलंदाज आव्हानासाठी सज्ज आहेत,’’ असेही मॉर्केनने सांगितले.
