भारत-श्रीलंका क्रिकेट मालिका : त्रिकुटामुळे भारताचे वर्चस्व

धवन, किशन, पृथ्वी यांच्या फटकेबाजीच्या बळावर श्रीलंकेवर सात गडी राखून मात

धवन, किशन, पृथ्वी यांच्या फटकेबाजीच्या बळावर श्रीलंकेवर सात गडी राखून मात

कोलंबो : ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करणाऱ्या भारतीय संघाचे सर्व प्रयोग रविवारी यशस्वी ठरले. कर्णधार शिखर धवन (९५ चेंडूंत नाबाद ८६ धावा), डावखुरा इशान किशन (४२ चेंडूंत ५९) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (२४ चेंडूंत ४३) या त्रिकुटाने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि ८० चेंडू राखून सहज पराभूत केले.

श्रीलंकेने दिलेले २६३ धावांचे लक्ष्य भारताने ३६.४ षटकांत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकर पृथ्वीने धडाकेबाज सुरुवात केल्यामुळे भारताने पाच षटकांतच अर्धशतकाची वेस ओलांडली. नऊ चौकारांची आतषबाजी केल्यावर पृथ्वी माघारी परतला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या किशनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावून धावगती कायम राखली. किशनने आठ चौकार आणि दोन षटकारांसह कारकीर्दीतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावत वाढदिवसही साजरा केला. बाद होण्यापूर्वी त्याने धवनच्या साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ८५ धावांची भर घातली.

त्यानंतर धवनने सामन्याची सूत्रे हाती घेत कारकीर्दीतील ३३वे अर्धशतक साकारले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मनीष पांडेने २६ धावांचे योगदान दिले, तर पदार्पणवीर सूर्यकुमार यादवने नाबाद ३१ धावा फटकावून धवनला सुयोग्य साथ दिली. ३७व्या षटकातील चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत धवनने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, तब्बल दोन वर्षांनी एकत्रित खेळणाऱ्या यजुर्वेद्र चहल (२/५२) आणि कुलदीप यादव (२/४८) या फिरकीपटूंच्या बळावर भारताने श्रीलंकेला ९ बाद २६२ धावांत रोखले. चहलने अविष्का फर्नाडोला (३३) आणि कर्णधार दसून शनाका (३९) यांना बाद केले, तर कुलदीपने भानुका राजपक्क्षा (२४) आणि मिनोद भानुका (२७) यांचे बळी मिळवले. अखेरच्या षटकांत चमिका करुणारत्नेच्या (नाबाद ४३) फटकेबाजीमुळे श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २६२ (चमिका करुणारत्ने नाबाद ४३; कुलदीप यादव २/४८, यजुर्वेद्र चहल २/५२) पराभूत वि. भारत : ३६.४ षटकांत ३ बाद २६३ (शिखर धवन नाबाद ८६, इशान किशन ५९, पृथ्वी शॉ ४३; धनंजया डीसिल्व्हा २/४९)

’ सामनावीर : पृथ्वी शॉ

१० शिखर धवन हा एकदिवसीय कारकीर्दीत ६,००० धावांचा टप्पा गाठणारा भारताचा १०वा फलंदाज ठरला.

इशान किशन हा कारकीर्दीतील पहिल्या एकदिवसीय व ट्वेन्टी-२० सामन्यात अर्धशतक साकारणारा रॉबिन उथप्पानंतरचा भारताचा दुसरा फलंदाज ठरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs sri lanka india beat sri lanka by 7 wickets in 1st odi zws

ताज्या बातम्या