India vs Sri Lanka Live Updates 1st test Day 5: भारताने श्रीलंकेला घरच्या मैदानावर नमवत गॉल कसोटीत १६५ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. भारताच्या या विजयात देवदत्त पडिक्कल व मानव सुथार यांनी विशेष कामगिरी केली आहे. मानव सुथारने या सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. तर देवदत्त पडिक्कलने पहिल्या डावात १६७ धावांची तर दुसऱ्या डावात ४४ धावांची खेळी केली होती. याशिवाय भारताच्या इतर खेळाडूंनीही महत्त्वाचं योगदान दिलं.
श्रीलंका ऑल आऊट
मानव सुथारने केशरा नुवांनथाला क्लीन बोल्ड करत श्रीलंकेला सर्वबाद केलं. यासह टीम इंडियाने गॉल कसोटीत १६५ धावांनी मोठा विजय मिळवला.
मानव सुथारच्या कसोटीत ५ विकेट्स
मानव सुथारने एका षटकात ३ विकेट्स घेतल्या आहेत. सोनल दिनुषा, प्रभात जयसूर्याला बाद केल्यानंतर लाहिरू कुमाराला झेलबाद करत पाचवी विकेट मिळाली. मानव सुथारने पहिल्यांदाच कसोटीत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
२ चेंडूत २ विकेट्स
सोनल दिनुषाला झेलबाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रभात जयसूर्याला क्लीन बोल्ड केलं.
सोनल दिनुषाच शतक हुकलं
सोनल दिनुषाच सलग दुसऱ्या डावात शतक हुकलं. मानव सुथारने ७६व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सोनल दिनुषाला झेलबाद केलं. दिनुषा ८ चौकार व एका षटकारासह ८४ धावा करत बाद झाला.
लंचब्रेक
पहिल्या सत्रात भारतीय संघाला २ विकेट्स घेण्यात यश आलं. तर पहिल्या सत्रात श्रीलंकेने ६ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या आहेत. यासह भारताकडे आता १९७ धावांची आघाडी आहे.
प्रसिध कृष्णाच्या खात्यात अजून एक विकेट
प्रसिध कृष्णाने ६०व्या षटकात निरोशन डिकवेला याला झेलबाद करत संघाला सहावी विकेट मिळवून दिली. आता टीम इंडियाला विजयासाठी ४ विकेट्सची गरज आहे. डिकवेला झेलबाद होण्याआधी यशस्वी जैस्वाल त्याला स्लेज करत होता आणि यानंतर सर्व चेंडू सोडून देत चांगला खेळत असलेला डिकवेलाने पुढचा चेंडू खेळला आणि तो विकेटच्या मागे झेलबाद झाला.
जड्डूने भारताला मिळवून दिली महत्त्वाची विकेट
रवींद्र जडेजान ५६व्या षटकात धनंजय डी सिल्वाला झेलबाद करवत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह त्याने ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी तोडली. कर्णधार डी सिल्वा ७ चौकारांसह ५९ धावांची खेळी करत बाद झाला.
धनंजय डी सिल्वा-सोनल दिनुषा यांची अर्धशतकं
धनंजय डी सिल्वा व सोनल दिनुषा यांनी अर्धशतकं झळकावत श्रीलंकेचा डाव सावरला आहे. यासह भारतीय संघ आता विकेटच्या प्रतिक्षेत आहे.
सामन्याला सुरूवात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला आहे. धनंजय डी सिल्वा आणि सोनल दिनुषा ही श्रीलंकेची जोडी मैदानावर आहे. तर सिराजने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.
IND vs SL Galle test: पाऊस पाचव्या दिवशी ठरणार का व्हिलन?
सध्या धनंजय डी सिल्वा आणि सोनल दिनुषा श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत विजयाच्या अगदी जवळ दिसत असला तरी, गॉलमध्ये पावसाची शक्यता असल्याने अंतिम निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, सामन्यातील पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गॉलमध्ये पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता ४९ टक्के शक्यता आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता पावसाची शक्यता ५२ टक्के आहे. तर दुपारी १२ वाजता पावसाची शक्यता ५८ ते ६० टक्के आहे.
