दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात श्रीलंका सध्या बॅकफूटवर असले तरी फिरकीपटू दिलरुवान परेराने सामन्याच्या सुरुवातीला अविस्मरणीय आनंद साजरा केला. सलामीवीर शिखर धवनला बाद करत परेराने कसोटी सामन्यातील १०० बळींचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमी सामन्यात हा टप्पा त्याने गाठला. त्याने २५ व्या सामन्यात शंभर बळींचा टप्पा पूर्ण केला. यापूर्वी दिग्गज फिरकीपटू मुथ्थय्या मुरलीधरनने श्रीलंकेकडून २७ सामन्यात शंभर बळी मिळवले होते. शंभर विकेट्सचा टप्पा पार करणारा श्रीलंकेचा तो सहावा गोलंदाज आहे.

भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजयने सुरुवातीला संयमी खेळ दाखवला. मात्र, दहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर परेराच्या चेंडूवर धवन झेलबाद झाला. त्याने २३ धावा केल्या. परेराने भारताची सलामी जोडी फोडण्यात यश मिळवल्यानंतर गमागेनं श्रीलंकेला दुसरे यश मिळवून दिले. भारताच्या आघाडीला सुरुंग लावल्यानंतर श्रीलंका सामन्यात एका वेगळ्या लयात उतरल्याचे दिसत असताना मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराटची आक्रमकता आणि मुरलीच्या संयमी खेळीसमोर श्रीलंकेची गोलंदाजी हतबल ठरली. कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली असून पहिल्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. विराट आणि मुरली यांची जोडी फोडण्याचे मोठे आव्हान श्रीलंकन गोलंदाजांसमोर निर्माण झाले आहे.