scorecardresearch

IND Vs SL 1st Test Match: रविंद्र जडेजाचं दमदार शतक, कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय टीम सुसाट, ४५० धावांचा टप्पा ओलांडला

जडेजाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने आतापर्यंत ११२ षटकांत ४६८ धावा केल्या.

रविंद्र जडेजाने दमदार खेळ करत शतक झळकावले.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना मोहाली येथे खेळवला जातोय. कसोटी सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतची चर्चा झाली. तर आज रविंद्र जडेजा सुसाट फलंदाजी करताना दिसतोय. जाडेजाने १६१ चेंडूमध्ये शतक झळकावले असून अजूनही तो मैदानात पाय रोवून आहे. जडेजाच्या या दमदार खेळीमुळे भारताने ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताचे सात गडी बाद झाले आहेत.

रविंद्र जडेजाचे दमदार शतक

कालच्या सहा बाद ३५७ धावांवरुन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर आज जडेजा आणि अश्विन ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने सुरुवातीपासून धावफलक फिरता ठेवल्यामुळे भारतीय संघाने ४५० धावांचा टप्पा ओलांडला. आज सुरुवातीपासून मैदानावर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळतेय. जडेजा आणि अश्विन या जोडीने शतकी भागिदारी केली. तर जडेजाने दमदार खेळीच्या जोरावर १६१ चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. अजूनही जडेजा मैदानवर पाय रोवून असून सध्या जेवणाचा ब्रेक झाला आहे. तर दुसरीकडे आर अश्विननेही उत्कृष्ट खेळी करत ६१ धाव्या केल्या. सध्या जयंत यादव मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकन गोलंदाजांनी अश्विन आणि जडेजा ही जोडी तोडण्याचा अटोकाट प्रयत्न केला. अखेर श्रीलंकन गोलंदाज लकमल याने आर. अश्विनला ६१ धावांवर तंबूत पाठवण्यात यश मिळवले.

सामन्याच्या पहिल्या दिवशी ३५७ धावा

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने ८५ षटकांत ६ बाद ३५७ धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने ९७ चेंडूमध्ये ९६ धावा केल्या. तर हनुमा विहारीने १२८ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली ४५ धावा करुन तंबूत परतला.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ८५ षटकांत ६ बाद ३५७ धावा (ऋषभ पंत ९६, हनुमा विहारी ५८)

सामन्याचा दुसरा दिवस : ११२ षटकांत ४६८ धावा, एकूण सात गडी बाद (सामना सुरु आहे.)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs sri lanka test 2022 second day ravindra jadeja hits century prd

ताज्या बातम्या