IND vs SL 3rd ODI : ‘घाऊक’ बदल केलेली टीम इंडिया ढेपाळली, श्रीलंकेला २२६ धावांचे आव्हान

श्रीलंकेकडून अकिला धनंजया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

india-vs-sri-lanka-third-one-day-match-2021 first inning
भारत वि. श्रीलंका

‘घाऊक’ बदल केलेल्या टीम इंडियासमोर तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने दमदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला, पण टीम इंडियाला पूर्ण षटकेही खेळता आली नाहीत. आज सहा खेळाडूंची अदलाबदल केलेली टीम इंडिया ४३.१ षटकात  २२५ धावांवर आटोपली. सलामीवीर पृथ्वी शॉ, संजू सॅमसन आणि मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने दिलेल्या योगदानामुळे भारताला दोनशेपार जाता आले. लंकेकडून अकिला धनंजया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत टीम इंडियाच्या डावाला सुरूंग लावला.

भारताचा डाव

पहिल्या वनडेत तुफान फटकेबाजीने सुरुवात करणाऱ्या पृथ्वी शॉने या सामन्यातही चांगली सलामी दिली. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. शॉने आपल्या खेळीत ८ चौकार ठोकले. दुसऱ्या बाजुला मात्र कर्णधार शिखर धवन (१३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. शॉला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने पायचित पकडले, तर धवन चमीराच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आज वनडे पदार्पण केलेल्या संजू सॅमसनने दमदार फलंदाजी करत आपली पात्रता सिद्ध केली. संजूने ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा ठोकल्या. २३ षटकात टीम इंडियाने ३ फलदाजांना गमावत १४७ धावा केल्या असताना पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात येईले हे शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा – IND vs SL : मॅच सुरू होण्यापूर्वीच भारताच्या कर्णधारानं केलं सेलिब्रेशन..पाहा व्हिडिओ

खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजीला उतरती कळा लागली. श्रीलंकेकडून आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या अकिला धनंजया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी धारदार गोलंदाजी केली. चांगल्या लयीत खेळणारा सूर्यकुमार यादव ४० धावा करून बाद झाला. तर हार्दिक पंड्या, पदार्पणवीर नितीश राणा आणि कृष्णप्पा गौतम चांगल्या धावा काढण्यात अपयशी ठरले. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने ४४ धावांत ४ तर जयविक्रमाने ५९ धावांत ३ बळी घेतले. दुश्मंता चमीराला २ बळी घेता आले.

 

भारताकडून पाच खेळाडूंचे पदार्पण

मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात बदल अपेक्षित होता. त्यानुसार भारतीय संघात सहा बदल करण्यात आले. त्यापैकी पाच खेळाडूंनी वनडे पदार्पण केले आहे. संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन साकारिया, कृष्णप्पा गौथम, राहुल चहर यांना वनडे कॅप देण्यात आली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही आज खेळण्याची संधी मिळाली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही संघात तीन बदल केले. प्रवीण जयविक्रमा, अकिला धनंजया आणि रमेश मेंडिस यांना आज खेळण्याची संधी मिळाली.

भारतीय संघ 

पृथ्वी शॉ, शिखर धवन (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, नितीश राणा, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौथम, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका संघ

दासुन शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्व्हा, अविष्का फर्नाडो, भानुका राजपक्षा, चरिथ असलंका, मिनोद भानुका, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुश्मंथा चमीरा, अकिला धनंजया, प्रवीण जयविक्रमा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India vs sri lanka third one day match 2021 first inning report adn