Asian Games 2026 India Womens Cricket Final Shafali Verma Century: २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने धडक मारली आहे. भारताने बांगलादेशचा ११४ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ गडी बाद १९५ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १५.४ षटकांत ८१ धावांत सर्वबाद झाला. आता सुवर्णपदकासाठी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघ कोणत्या संघाशी आणि कधी भिडणार जाणून घेऊया.

भारताने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि स्मृती मानधना-शफाली वर्माच्या जोडीने हा निर्णय अगदी योग्य असल्याचं सिद्ध केलं. स्मृती व शफालीने पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. तर शफाली वर्माने दमाकेदार फलंदाजी करत पहिलं टी-२० शतक झळकावलं. तिने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत ४९ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं; या खेळीत ३ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता.

शफाली वर्मा १०० धावांची खेळी करत नाबाद परतली. व्हाईट-बॉल क्रिकेटमधील हे तिचं पहिलंच शतक आहे आणि या कामगिरीसह, आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. याव्यतिरिक्त, भारतासाठी स्मृती मानधनाने १९ चेंडूंत ३७ धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंत ४० धावा केल्या. दरम्यान, कमालिनी (३ धावा), रिचा घोष (२ धावा) आणि भारती फुलमाळी (९ धावा, नाबाद) यांना फारशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशकडून मारुफा अख्तर, संजिदा अख्तर, राबेया खान आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. यासह भारताने बांगलादेशला विजयासाठी १९६ धावांचं मोठं आव्हान दिलं.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संघाला पहिला धक्का बसला, जेव्हा जुएरिया फिरदौस खातंही न उघडता ‘गोल्डन डक’वर (पहिल्याच चेंडूवर) बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतरही संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावले; सलामीवीर दिलारा अख्तर आणि शर्मिन अख्तर (१० धावा) तसेच सुलताना खातून (१२ धावा) यांचा अपवाद वगळता, इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

२३ चेंडूंत २७ धावा केल्यानंतर दिलिरा बाद झाली; तिच्या खेळीत चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजी आक्रमणानुसार खेळपट्टीवर स्थिरावता आलं नाही. भारताकडून नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामना कधी?

स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव करत श्रीलंकेने अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. आता सुवर्णपदकासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता खेळवला जाईल. विजयी संघाला सुवर्णपदक मिळेल, तर पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागेल. दरम्यान, कांस्यपदकासाठीच्या सामन्यात पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होईल.