Yashasvi Jaiswal Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पण एका चुकीमुळे यशस्वी जैस्वाल धावबाद होऊन माघारी परतला. जैस्वालला या सामन्यात अवघ्या ३२ धावा करता आल्या. पण मैदानात उतरताच यशस्वी जैस्वालने एक दुर्मिळ रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

कर्णधार शुबमन गिलचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

गॉलच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. त्यानंतर जैस्वाल धावबाद होऊन माघारी परतला. पण त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. यादरम्यान केएल राहुल ७७ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. तर देवदत्त पडिक्कलने शतक पूर्ण केलं. कर्णधार शुबमन गिल अवघ्या १६ धावांवर माघारी परतला.

३० सामने, ३० मैदानं…

यशस्वी जैस्वाल आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मैदानात उतरताच त्याच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत खेळलेले सर्व ३० सामने हे वेगवेगळ्या देशात आणि ३० वेगवेगळ्या मैदानावर जाऊन खेळले आहेत. ज्या मैदानावर तो कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला, त्या मैदानांवर तो पुन्हा सामना खेळण्यासाठी उतरलेला नाही. याआधी संजय मांजरेकर यांनी ३३ कसोटी सामने हे ३३ वेगवेगळ्या मैदानांवर खेळले होते. तर सचिन तेंडुलकरने ३२ मैदानांवर ३२ सामने खेळले होते. आता या यादीत जैस्वालचं नाव जोडलं गेलं आहे. जैस्वालने ३० मैदानावर ३० सामने खेळले आहेत.

या सामन्यातही जैस्वालला चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्याला धावबाद माघारी परतावं लागलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो धावबाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ३० सामन्यांमध्ये तो ३ वेळा धावबाद झाला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो ८२ आणि १७५ धावांवर असताना धावबाद होऊन माघारी परतला होता.