Yashasvi Jaiswal Runout Controversy, KL Rahul Gets Angry: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरु आहे. हा भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ६०० वा कसोटी सामना आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. पण दोघांमध्ये ताळमेळ दिसून आला नाही, त्यामुळे यशस्वी जैस्वालला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.
तर झाले असे की, भारतीय संघाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरु असताना श्रीलंकेकडून ११ वे षटक टाकण्यासाठी केशरा नुवांथा गोलंदाजीला आला. तोपर्यंत भारतीय संघाने ४७ धावा जोडल्या होत्या. तर शेवटच्या चेंडूवर केएल राहुल स्ट्राईकवर होता. केशरा नुवांथाने पॅड लाईनवर चेंडू टाकला. जो केएल राहुलने ढकलून दिला आणि चेंडू शॉर्ट मिडऑनच्या दिशेने जात होता. त्यावेळी गोलंदाज केशरा नुवांथाने डाईव्ह मारुन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जैस्वालला अडथळा निर्माण झाला. केशरा नुवांथाचा धक्का लागल्याने जैस्वालचा तोल गेला आणि तो तिथेच पडला. तर दुसरीकडे केएल राहुलला वाटलं की, धावून एक धाव सहज घेता येईल. त्यामुळे तो धावत आला आणि क्रिझच्या मध्यापर्यंत पोहोचला.
केएल राहुल की यशस्वी जैस्वाल? नेमकी चूक कोणाची?
जैस्वाल पडला आहे, हे पाहून केएल राहुल जागीच थांबला. पण नेमकं तेव्हाच जैस्वाल उभा राहिला आणि धाव घेण्याच्या तयारीत होता. हे पाहून केएल राहुलने माघारी न जाता, धाव पूर्ण केली. पण जैस्वालनेही माघार घेतल्याने दोन्ही फलंदाज एकाच एंडवर आले. केएल राहुलने जैस्वालने बॅट टेकवण्याआधी बॅट टेकवली, त्यामुळे नियमानुसार जैस्वालला माघारी परतावं लागलं. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला आणि यष्टीरक्षक डिकवेलाकडे फेकला, पण त्याने लगेच बेल्स उडवल्या नाहीत. त्याने स्लिपमध्ये असलेल्या कर्णधार डी सिल्वाकडे पाहत बेल्स उडवू की नको, अशी विचारणा केली. कर्णधाराने त्याला बेल्स उडव असा इशारा केला. त्यानंतर पंचांनी श्रीलंकेचे खेळाडू अपील मागे घेणार आहेत की नाही, हे तपासून पाहिलं. पण श्रीलंकेच्या खेळाडू आपल्या अपीलवर कायम राहिले.
केएल राहुल श्रीलंकेच्या गोलंदाजावर भडकला
जो काही गोंधळ झाला तो श्रीलंकेच्या गोलंदाजामुळे झाला. केशरा नुवांथाचा धक्का लागला नसता, तर जैस्वाल पडला नसता. असं झाल्यानंतरही श्रीलंकेच्या खेळाडूंनी खेळभावना दाखवली नाही. त्यामुळे केएल राहुल केशरा नुवांथावर संतापला. दोघेही चांगली फलंदाजी करत होते. यशस्वी जैस्वाल धावबाद होऊन परतण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत द्विशतकी खेळी करण्याची संधी असताना तो धावबाद होऊन माघारी परतला होता.
