Shubman Gill vs Gautam Gambhir Viral Video: कोलंबोत भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५०० हून अधिक धावांचा डोंगर उभारला होता. त्यावेळी असं वाटलं होतं की, भारतीय संघ हा सामना एकहाती जिंकणार. पण सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला असून, श्रीलंकेने दमदार पुनरागमन केलं आहे. यादरम्यान गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सोपा विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. भारतीय संघाने ५०० धावांचा डोंगर उभारल्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या २९० धावांवर संपुष्टात आणला. इथे भारतीय संघ आघाडी घेऊन दुसऱ्या डावात फलंदाजीला येऊ शकला असता. पण कर्णधार गिल आणि भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. इथेच निर्णय चुकला आणि श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली.

सामन्यातील चौथ्या दिवशी फलंदाजी करताना श्रीलंकेने ६ गडी बाद २२९ धावा केल्या होत्या. यासह १६ धावांनी आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या दिवशी भारतीय संघाला फक्त ४ फलंदाजांना बाद करायचं होतं. पण सोनल आणि केशरा नुवंथाने दमदार शतकी भागीदारी केली आणि श्रीलंकेची धावसंख्या ३०० पार पोहोचवली आणि मोठी आघाडी मिळवून दिली. विकेट मिळत नसल्याने गौतम गंभीरने शुबमन गिलला ड्रेसिंग रुममध्ये बोलावून घेतलं आणि गंभीर त्याच्याशी बराच वेळ चर्चा करताना दिसून आला. यादरम्यान उपकर्णधार केएल राहुल संघाचं नेतृत्व करताना दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, गंभीर गिलवर ओरडताना दिसून आला. आता टीम इंडिया पुनरागमन करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

श्रीलंका ३५० पार…

श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या २९० धावांवर आटोपला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने ३५० धावांचा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेकडून कामिल मिशाराने ३२ धावांची खेळी केली. तर पसिंदू सूर्याबंदारा ९२ धावांवर माघारी परतला. तर कामिंदू मेंडिसने ५५ धावांची खेळी केली. तर केशरा नुवांथाने ४६ धावा केल्या. यादरम्यान सोनल आणि नुवांथाने दमदार शतकी भागीदारी केली.