Ravindra Jadeja Named Unwanted Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबोत सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीचे ३ दिवस भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला. पण त्यानंतर पुढील २ दिवसांत श्रीलंकेने दमदार पुनरागमन केलं आहे. या सामन्यातही फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. पण भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.

रवींद्र जडेजा हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक स्टार फलंदाजांना त्याने आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. श्रीलंकेतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. तो गोलंदाजीत तर चमकला, पण डीआरएस घेण्याच्या बाबतीत त्याचा रेकॉर्ड हवा तितका खास राहिलेला नाही.

तर झाले असे की, कोलंबोत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात जडेजाचा एक चेंडू केषरा नुवांताच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी जडेजा आणि भारतीय खेळाडूंनी अंपायरकडे जोरदार अपील केली. पण अंपायरने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर भारतीय संघाने डीआरएसची मागणी केली. पण डीआरएसमध्ये दिसून आलं की, चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर पॅडला जाऊन लागला. त्यामुळे भारतीय संघाने घेतलेला रिव्ह्यू वाया गेला. यासह जडेजाच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. सलग २२ वेळेस जडेजाच्या गोलंदाजीवर भारतीय संघाने डीआरएसची मागणी केली आणि तो चुकीचा ठरला आहे.

डीआरएस घेण्यात यष्टीरक्षकाचीही भूमिका तितकीच महत्वाची असते. याआधी धोनीने जितके रिव्ह्यू घेतले आहेत, त्यापैकी बरेच रिव्ह्यू हे यशस्वी राहिले आहेत. पण गेल्या २२ डीआरएसपैकी १८ रिव्ह्यू हे भारतीय संघाला गमवावे लागले आहेत. तर ४ वेळेस अंपायर्स कॉल असल्यामुळे रिव्ह्यू गमावलेला नाही. त्यामुळे जडेजाने घेतलेला एकही रिव्ह्यू यशस्वी राहिलेला नाही. मुख्य बाब म्हणजे जडेजाने शेवटचा यशस्वी रिव्ह्यू घेऊन ३ वर्ष उलटले आहेत. याआधी २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटीत जडेजाने केमार रोचविरुद्ध डीआरएसची मागणी केली होती आणि तो यशस्वी ठरला होता. जडेजा भारतीय संघातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. पण डीआरएसच्या बाबतीत त्याला नशिबाने साथ दिलेली नाही.