India vs Srilanka Warm Up Match: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून गॉलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधी दोन्ही संघ सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दोन्ही संघांमध्ये ३ दिवसीय सराव सामना सुरु आहे. श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर गोलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण भारतीय गोलंदाज एक विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसून आले आहेत.

कोलंबोत सुरु असलेल्या या सराव सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिली. श्रीलंकेकडून निशान मदुश्का आणि रविंदू रसन्थाने मिळून पहिल्या विकेटसाठी ११० धावा जोडल्या. यादरम्यान मदुश्काने ६६ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. मुख्य बाब म्हणजे, भारतीय गोलंदाज ही जोडी फोडण्यात अपयशी ठरले. मदुश्का आपल्या चुकीमुळे आणि केएल राहुलने केलेल्या थ्रो मुळे बाद होऊन माघारी परतला. मदुश्का ज्यावेळी फलंदाजी करत होता, त्यावेळी तो १०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता.

भारतीय गोलंदाजांचा फ्लॉप शो

भारतीय संघाला ही मालिका सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याची कमतरता पहिल्याच सामन्यातील पहिल्याच दिवशी जाणवली. भारतीय संघाकडून प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार या गोलंदाजांनी गोलंदाजी केली. पण यापैकी एकाही गोलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. हे भारतीय संघासाठी मुळीच चांगले संकेत नाहीत. कारण हेच खेळाडू श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळताना दिसून येणार आहेत.जर अशीच गोलंदाजी केली, तर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकणं कठीण आहे. गोलंदाजांनी विकेट्स काढून देणं, महत्वाचं ठरणार आहे.

पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात गोलंदाजी करताना मदुश्काचा रनआऊट वगळला, तर भारतीय फलंदाजांना एकही विकेट घेता आला नाही. मुख्य बाब म्हणजे, श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर सहज धावा करताना दिसून आहे. या गोलंदाजीक्रमात रवींद्र जडेजा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. पण तो देखील एकही विकेट घेऊ शकलेला नाही. पहिल्या सत्रात गोलंदाजी करताना त्याने ५ षटकं टाकली, यादरम्यान त्याने २९ धावा खर्च केल्या. यादरम्यान एकाच षटकात त्याने १५ धावा खर्च केल्या. तर सिराजने ५ षटकात १४, प्रसिध कृष्णाने ५ षटकात २७, गुरनूर ब्रारने ४ षटकात २५ धावा खर्च केल्या.