Women T20 Asia Cup 2026 IND W vs THAI W: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. यंदाची ही स्पर्धा दुबईत खेळवली जात आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आज म्हणजेच रविवारी ३० ऑगस्टपासून आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. भारताचा पहिला सामना थायलंडशी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार आणि सामना कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घेऊया.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ २०२६ महिला टी-२० आशिया कप स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात रविवारी दुबईत थायलंडविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. गतविजेता भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, अलीकडील कामगिरी पाहता संघासमोर काही आव्हानं आहेत. भारताने यावर्षी खेळलेल्या १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आहेत. तसेच टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे आशिया कपमध्ये भारतीय संघाला अनेक बाबींवर सुधारणा करण्याची गरज आहे.
जेमिमा रॉड्रिग्सच्या अनुपस्थितीचा भारताला मोठा फटका बसला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जेमिमा स्पर्धेतून बाहेर झाली असून तिच्या जागी प्रतिका रावलला संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, दबावाच्या परिस्थितीत डाव सावरण्यासोबतच गरजेनुसार आक्रमक फलंदाजी करू शकेल अशा अनुभवी आणि भरवशाच्या मधल्या फळीतील फलंदाजाची भारताला उणीव भासू शकते. त्यामुळे स्मृती मानधाना आणि शेफाली वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.
दुसरीकडे, थायलंडनेही स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यांनी हाँगकाँगचा ६ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला पुन्हा लय मिळवण्यासाठी महिला आशिया कप ही महत्त्वाची स्पर्धा ठरणार आहे. विशेष म्हणजे, थायलंडला आतापर्यंत भारताविरुद्ध एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही.
भारत-थायलंड टी-२० आशिया चषक सामना किता वाजता सुरू होणार?
महिला टी-२० आशिया चषकातील भारत आणि थायलंड यांच्यातील सामना ३० ऑगस्टला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल. हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारत-थायलंड सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर सोनी लिव्ह अॅपवर सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.
महिला टी-२० आशिया चषकासाठी भारताचा संपूर्ण संघ
स्मृती मानधाना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, श्री चरणी, नंदनी शर्मा, रेणुका सिंह ठाकूर, प्रतिका रावल, राधा यादव, गुणालन कमलिनी, प्रेमा रावत.
थायलंडचा संघ
अफिसारा सुवानचोनराथी, फान्निता माया, नन्नापत कोंचारोएनकाई (यष्टीरक्षक), नारुमोल चाईवाई (कर्णधार), चनिदा सुथिरुआंग, नाओमी हॅमिल्टन, सुलीपॉर्न लाओमी, नन्नाफत चाईहान, सुनिदा चातुरोंग्रत्तना, ओनिचा कामचोम्फू, थिपत्चा पुथावोंग, कोरानित सुवानचोनराथी, चायनिसा फेंगफेन, थानरदा सीसावान, नत्ताकान चांतम.
