ॲमस्टेलवीन (नेदरलँड्स) : अर्ध्या शतकापेक्षाही अधिक काळापासूनचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. बदलत्या स्वरुपात होणार्‍या यंदाच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील आपल्या मोहिमेस भारतीय संघ आजपासून वेल्सविरुद्धच्या लढतीने सुरुवात करेल.

चुकीला माफी नाही असे काहीसे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे स्वरुप आहे. अशा वेळी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली आणि क्रेग फुल्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ वेल्सवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात भर घालण्यास उत्सुक आहे. या विजयामळे भारताच्या अशा एका मोहिमेची दमदार सुरुवात होईल. गेल्या ५१ वर्षांचा विजयमंचावर येण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी ही सुरुवात प्रेरक ठरु शकते. भारताने आतापर्यंत केवळ १९७५ मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. तेव्हा अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने क्वालालम्पूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.

आम्हाला भारतीय हॉकीमध्ये आमचा स्वत:चा नवा इतिहास लिहायचा आहे, असे सांगून त्यांनी खेळाडूंना १९७५ च्या सावलीत जगण्याऐवजी स्वत:ची नवीन कहाणी तयार करण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे. भारताने यापूर्वी १९७१ मध्ये कांस्य आणि १९७३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. आता पाच दशकांहून अधिक काळानंतर, सध्याच्या पिढीकडे हा इतिहास बदलण्यासाठी आवश्यक अनुभव, खोली आणि आत्मविश्वास असल्याचा विश्वास संघात आहे.

‘‘भारतीय संघ या स्पर्धेत मोठ्या सकारात्मकतेसह उतरत आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताने ऑलिम्पिकमधील ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही संघाने कांस्यपदक राखण्याची कामगिरी केली होती. आता हेच सातत्य विश्वचषकाच्या मंचावर दाखवण्याचे मोठे आव्हान संघासमोर असेल,’’ असे हरमनप्रीतने स्पर्धेसाठी रवाना होताना सांगितले होते.

जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या भारतासाठी, वेल्सविरुद्धचा हा पहिला सामना कागदावर तरी सोपा दिसतो आहे. मात्र, नव्या स्वरुपामुळे स्पर्धेत चांगली सुरुवात करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव आतापर्यंत सर्व खेळाडूंना झाली आहे.  याच गटात पुढे इंग्लंड आणि पाकिस्तानसारखे तगडे संघ भारताच्या वाटेत असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

’ वेळ : सायं. ४.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, जिओहॉटस्टार ॲप.