India vs West Indies 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघ २९६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नाबाद १३९ धावांच्या आणि शुबमन गिलच्या ११० धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ८ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली आहे. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाचा दमदार विजय
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ५० षटकांत २९६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या शुबमन गिल आणि रोहित शर्माच्या जोडीने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ३२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीच्या जोडीने मिळून दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यादरम्यान शुबमन गिलने ११० धावांची खेळी केली. त्यानंतर विराटने ऋतुराज गायकवाडसोबत मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. ऋतुराजने एकेरी दुहेरी धाव घेत विराटला स्ट्राईक दिली. तर विराटने ७४ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्याने १३९ धावांची खेळी करून भारतीय संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
वेस्ट इंडिजने दिलं २९६ धावांचं आव्हान
या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात करण्यासाठी जस्टीन ग्रीव्ह्स आणि जॉन कॅम्पबेलच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. यादरम्यान कॅम्पबेलने ६२ आणि ग्रीव्ह्सने १०१ धावांची दमदार शतकी खेळी केली. शेवटी आमीर जंगूने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने ५० षटकांअखेर ७ गडी बाद २९५ धावा केल्या.
विराट कोहलीचं विक्रमी शतक
विराट कोहली बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. पण त्याच्या फलंदाजीची धार अजूनही तशीच होती. या डावात त्याने आधी षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं, त्यानंतर षटकार खेचून शतकही पूर्ण केलं. दरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५ हजार धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यासह वनडे कारकिर्दीत ५५ वे शतक पूर्ण केले.
