India vs West Indies 1st T20 Ekana Stadium Flood Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आता पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. आज म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून या मालिकेला सुरूवात होणार असून पहिला सामना लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये खेळवला जाईल. लखनौमधील हा पहिलाच सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे आणि यामागचं कारण म्हणजे पुराचं पाणी.
सामन्यांवर सहसा पाऊस किंवा खराब हवामानाचं सावट असतं. मात्र, लखनौमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यावर पुराच्या पाण्यामुळे संकट ओढवलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोमती नदीच्या वाढत्या पाणी पातळीचा फटका सामन्याचं यजमानपद भूषवणाऱ्या ‘एकाना क्रिकेट स्टेडियम’च्या परिसराला बसला आहे. स्टेडियमच्या आसपास पाणी साचल्यामुळे त्या भागाकडे जाणारा अंडरपासही बंद करण्यात आला आहे, ज्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ शकतो.
लखनौमध्ये पुराचं सावट
भारताच्या सामन्यापूर्वी स्टेडियमजवळील नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. नदीचं पाणी स्टेडियमच्या गेट क्रमांक १ पासून सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत पोहोचलं आहे. काही दिवसांपूर्वी स्टेडियमपासून काही अंतरावर नदीकाठी संरक्षक बांध उभारण्यात आला होता. आता पाणी त्या बांधालाही लागलं आहे. मात्र, एकाना स्टेडियम उंच ठिकाणी असल्याने सध्या नदीचं पाणी स्टेडियममध्ये पोहोचण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन नदीकाठावर कायमस्वरूपी संरक्षणात्मक बांधकाम करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.
गोमती नदीच्या पूराच्या पाण्याचा विचार करता गेट क्रमांक १ जवळ मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. नदीच्या पाण्याचा वाढता प्रवाह रोखण्यासाठी आणि स्टेडियम परिसराचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. एकाना स्टेडियमसमोरून शहीद पथ जातो, तर त्याच्या दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालय आहे. सध्या पोलीस मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर सुमारे एक फूट पाणी साचलं आहे.
स्टेडियमच्या या आवरात एक अंडरपासही आहे. त्यात सध्या सुमारे दोन फूट पाणी साचलं असून, पोलीस कर्मचारी दुचाकीस्वारांना या मार्गाने जाण्यापासून रोखत आहेत.स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर साचलेलं हे पाणी गोमती नदीचं नाही. गोमती नदीत जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे हे पाणी रस्त्यांवर पसरल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
पुराच्या धोक्याबाबतची परिस्थिती स्पष्ट करताना, एकाना क्रिकेट स्टेडियमच्या व्यवस्थापनाने सांगितलं की याचा सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही; ही एक चांगली बातमी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना नियोजित वेळेनुसारच सुरू होईल, असं तूर्तास प्रशासनाने म्हटलं आहे.
