कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ८ धावांनी मात दिली. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित ब्रिगेडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी दमदार अर्धशतके ठोकत पाहुण्यांना १८७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने दमदार झुंज दिली. निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी मोठ्या फटक्यांची आतषबाजी करत संघाला विजयाजवळ नेले, पण त्यांची झुंज अपुरी ठरली. विंडीजचा संघ २० षटकात ३ बाद १७८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

वेस्ट इंडीजचा डाव

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
Delhi Capitals vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
GT vs DC : दिल्लीचा IPL मधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…
Delhi Capitals vs Chennai Super Kings IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 DC vs CSK Highlights : दिल्ली कॅपिटल्सने उघडले विजयाचे खाते, चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी रथाला लागला ब्रेक

भारताच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काईल मेयस आणि ब्रँडन किंग यांनी विंडीजला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी ३३ धावांची भागीदारी केली. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने मेयर्सला (९) आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर रवी बिश्नोईने किंगला (२२) आपल्या फिरकीत अडकवले. सलामीवीर माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी धावगती पुढे नेली. या दोघांच्या भागीदारीदरम्यान भारतीय संघाने दोन झेल सोडले.पूरन-पॉवेलने भारतीय गोलंदाजाविरुद्ध खोऱ्याने धावा जमवत शतकी भागीदारी केली. शेवटच्या दोन षटकात विंडीजला २९ धावांची आवश्यकता होती. १९व्या षटकात भुवनेश्वरने पूरनला बिश्नोईकरवी झेलबाद केले. पूरनने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चार चेंडूत वेस्ट इंडीजला २३ धावांची आवश्यकता होती. पॉवेलने दोन षटकार खेचत धाकधुक वाढवली, पण हर्षलने नियंत्रित गोलंदाजी करत सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. भारताने हा सामना ८ धावांनी जिंकला. वेस्ट इंडीजला २० षटकात ३ बाद १७८ धावांपर्यंत पोहोचला आले. पॉवेलने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६८ धावांची झुंज दिली.

भारताचा डाव

वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने भारताला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने भारताचा सलामीवीर इशान किशनला (२) स्वस्तात तंबूत धाडले. त्यानंतर कप्तान रोहित शर्माने विराट कोहलीसह संघाचे अर्धशतक पूर्ण केले. विराट आक्रमक शैलीत खेळला. रोहित रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने २ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा केल्या. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही (८) चेसला बळी ठरला. विराटने ७ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. अर्धशतकानंतर चेसने त्याची दांडी गूल केली. संघाचे चार फलंदाज तंबूत परतल्यानंतर ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी चौकार-षटकारांसह धावा जमवल्या. शेवटच्या षटकात रोमारियो शेफर्डने अय्यरला बोल्ड केले. अय्यरने १८ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. पंत २८ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांवर नाबाद राहिला. भारताने २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. विंडीजकडून चेसने २५ धावांत ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing XI

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, यजुर्वेंद्र चहल.

वेस्ट इंडीज : ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, अकिल होसेन, रोमारियो शेफर्ड, शेल्डन कॉट्रेल.