scorecardresearch

IND vs WI 3rd T20 : पाहुण्यांची झोळी रिकामीच..! टी-२० मोहीम फत्ते करत भारतानं विंडीजला दिला क्लीन स्वीप!

ईडन गार्डन्सवर रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतानं विंडीजला १७ धावांनी मात दिली.

India vs West indies 3rd t20 match report
भारतानं जिंकली वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० मालिका

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाहुण्या वेस्ट इंडीजला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विंडीजला १७ धावांनी मात देत ३-० अशी मालिका जिंकली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला १८५ धावांचे आव्हान दिले. वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका आधीच खिशात टाकल्यामुळे रोहितने संघबदल केला. पण त्याच्यासहित ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादवची स्फोटक अर्धशतकी खेळी आणि त्याला व्यंकटेश अय्यरने दिलेली सुंदर साथ भारताला चांगल्या धावसंख्येकडे घेऊन गेली. शेवटच्या ४ षटकात भारताने ८६ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात अर्धशतकवीर निकोलस पूरनव्यतिरिक्त विंडीजच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि त्यांना २० षटकात ९ बाद १६७ धावांपर्यंतच पोहोचला आले. या विजयासह भारताने टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

वेस्ट इंडीजचा डाव

भारताच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने दोन्ही सलामीवीर काईल मेयर्स (६) आणि शाई होपला (८) तंबूत पाठवले. त्यानंतर निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी अर्धशतकी भागीदारी उभारली. या दोघांनी स्फोटक फटके खेळले. पॉवेल मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याला झेलबाद केले. शार्दुल ठाकूरने पॉवेलचा (२५) अप्रतिम झेल टिपला. विंडीजचा कप्तान कायरन पोलार्ड (५) आणि जेसन होल्डर (२) यांनीही आपल्या विकेट स्वाधीन केल्या. व्यंकटेश अय्यरने दोघांना बाद केले. हर्षल पटेलने रोस्टन चेसची दांडी गुल करत विंडीजचे कंबरडे मोडले. १०० धावांत पाहुण्यांनी ६ फलंदाज गमावले. त्यानंतर पूरनने रोमारियो शेफर्डसोबत किल्ला लढवला पूरनने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केले, पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. १८व्या षटकात शार्दुल ठाकूरने पूरनला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. पूरनने ८ चौकार आणि एका षटकारासह ६१ धावा केल्या. १९व्या षटकात शेफर्डही (२९) बाद झाला आणि विंडीजच्या विजयाच्या आशा मावळल्या. २० षटकात विंडीजला ९ बाद १६७ धावांपर्यंतच पोहोचला आले. भारताकडून हर्षल पटेलने ३ बळी घेतले. तर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर आणि व्यंकटेश अय्यर यांना २ बळी मिळाले.

भारताचा डाव

भारताने आज ऋतुराजला संधी देत इशान किशनसोबत सलामीला पाठवले. पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला केवळ ४ धावा करता आल्या. विंडीजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने त्याला झेलबाद केले. त्यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरसोबत किशनने अर्धशतकी भागीदारी रचली. हेडन वॉल्शने अय्यरला (२५) बाद करत ही भागीदारी मोडली. अय्यरपाठोपाठ किशनही माघारी परतला. त्याने ५ चौकारांसह ३४ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर कप्तान रोहित शर्मा फलंदाजीला आला, पण तोही अपयशी ठरला. रोहितला ७ धावा करता आल्या. ९३ धावांवर भारताने ४ फलंदाज गमावले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी संघाला शतकापार पोहोचवले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी लगावत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. शेवटच्या षटकात सूर्यकुमारने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९ आणि २०व्या षटकात भारताने प्रत्येकी २१ धावा काढल्या. सूर्यकुमारने ३१ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली, तर अय्यर ४ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला. २० षटकात भारताने ५ बाद १८४ धावा केल्या.

या सामन्यात भारतीय संघाने ४ बदल केले. माजी कर्णधार विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली. तर मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली. वेगवान गोलंदाज आवेश खानने टी-२० पदार्पण केले.

दोन्ही संघांची Playing 11

भारत: ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा ( कर्णधार ), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान.

वेस्ट इंडिज: काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन ( यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, कायरन पोलार्ड ( कर्णधार), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन लन, हेडन वॉल्श.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs west indies 3rd t20 match report adn