हैदराबाद : चांगल्या लयीत असलेल्या भारतीय फलंदाजांचा प्रयत्न वेस्ट इंडिजविरुद्ध आज, बुधवारी होणार्‍या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा असेल. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी त्यांना केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. दुसरीकडे, विंडीजचे लक्ष्य या सामन्यात विजय नोंदवत मालिकेत बरोबरी साधण्याचे असेल. पुन्हा एकदा दोन्ही संघांची मदार आक्रमक फलंदाजांवर असणार आहे.

भारताने या मैदानावर यापूर्वीचा ट्वेन्टी-२० सामना बांगलादेशविरुद्ध २०२४ मध्ये खेळला होता. भारताने त्यावेळी सहा बाद २९७ धावा करीत १३३ धावांनी विजय मिळवला होता. संजू सॅमसनने या लढतीत ४३ चेंडूंत १११ धावा केल्या होत्या. त्यामुळे याच कामगिरीच्या पुनरावृत्तीच्या इराद्याने तो मैदानात उतरेल. 

विंडीजकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित

विंडीजचा सलामी फलंदाज शेरफेन रुदरफोर्डने आतापर्यंत १८९च्या स्ट्राईक रेटने १७२ धावा केल्या. त्याने तीन सामन्यांत १२ षटकार लगावले. कर्णधार शे होपने १८२च्या स्ट्राईक रेटने १५९ धावांची भर घातली. जगज्जेत्या भारताविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास विंडीजला सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल. भारताला गोलंदाजीत चमक दाखवावी लागले. कारण, दुसर्‍या ट्वेन्टी-२० सामन्यात विंडीजने २५० धावांचे लक्ष्य नऊ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले होते. या लढतीत होपने १०२ धावांची खेळी केली होती. इंदूरच्या सामन्यात शिमरोन हेटमायर (४३), कामिल पूरन (४२) आणि स्प्रगिंर (नाबाद ३५) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजांकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

* वेळ : सायं. ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १

हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

सॅमसन, अभिषेक, किशनकडे लक्ष

भारताच्या शीर्ष फळीतील फलंदाज संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशनने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मालिकेत आतापर्यंत मध्यक्रमावर अधिक दबाव आलेला नाही. अभिषेकने इंदूरमध्ये तिसर्‍या ट्वेन्टी-२० सामन्यात ३० चेंडूंत ६९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने सहा चौकार व पाच षटकार लगावले होते. मध्यक्रमातील फलंदाजांना फारसा सराव न मिळाल्याची चिंता भारतीय संघ व्यवस्थापनाला असेल. शीर्ष तीन फलंदाज अपयशी ठरल्यास तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि नमन धीर यांना जबाबदारी संभाळावी लागेल. कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात शतक झळकावले होते. दुसर्‍या सामन्यात सॅमसन आणि इशान यांनी मोठ्या खेळी केल्या, मात्र ही लढत वेस्ट इंडिजने जिंकली. तिसर्‍या लढतीत अभिषेकचे योगदान राहिले. भारतीय गोलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. गेल्या लढतीत अर्शदीपने तीन गडी बाद केले होते.