बंगळूरु : सपाट खेळपट्ट्यांचा पुरेपूर फायदा घेताना भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील फलंदाजांनी सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत वर्चस्व गाजवले असून चार सामन्यांनंतर मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील निर्णायक पाचवा ट्वेन्टी-२० सामना आज, शनिवारी बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. छोटेखानी मैदान आणि फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीचा अंदाज, यामुळे पुन्हा एकदा दोन्ही संघांतील गोलंदाजांचा कस लागणे अपेक्षित आहे.

या मालिकेत आतापर्यंत फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. चार सामन्यांत मिळून दोन्ही संघांनी अवघ्या ९१८ चेंडूंमध्ये ९८ षटकारांची आतषबाजी केली आहे. ‘आयसीसी’च्या पूर्ण सदस्य देशांदरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेत यापेक्षा अधिक षटकारांची नोंद करणार्‍या केवळ तीन मालिका झाल्या आहेत. दोन्ही संघांनी चार सामन्यांत मिळून ८०० धावांचा टप्पाही ओलांडला आहे. त्यामुळे प्रतिस्पध्र्यांच्या फलंदाजीला लगाम घालणे हे गोलंदाजांसमोरील सर्वांत मोठे आव्हान असेल.

विंडीजचा कर्णधार शे होप आणि आक्रमक फलंदाज शेर्फेन रुदरफोर्ड यांनी भारतीय गोलंदाजीवर सातत्याने हल्ला चढवला आहे. या दोघांना सुरुवातीलाच रोखण्याचा प्रयत्न भारतीय गोलंदाजांना करावा लागेल.  गेल्या दोन सामन्यांत संघाबाहेर राहिलेल्या चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवचे पुनरागमन होऊ  शकते. मधल्या षटकांत बळी मिळवण्याची कुलदीपची क्षमता भारतासाठी महत्त्वाची ठरू शकेल.

’ वेळ : सायंकाळी ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,

१ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

भुवनेश्वरच्या समावेशाने बळकटी

’ विंडीजविरुद्धच्या निर्णायक पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी अर्शदीप सिंगच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाला असून निवड समितीने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

’ गेल्या सामन्यात फलंदाजी करताना अर्शदीपच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. तो अनुपलब्ध असल्यास भुवनेश्वरला थेट अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळू शकेल.

’ तसे झाल्यास ३६ वर्षीय भुवनेश्वरसाठी हा विशेष क्षण ठरेल. ‘आयपीएल’च्या गेल्या दोन हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजेतेपदांमध्ये त्याने मोलाची भूमिका बजावली. २०२५ मध्ये त्याने १७, तर २०२६ मध्ये २८ बळी मिळवले होते.

’ आता याच बंगळूरु संघाच्या घरच्या मैदानावर त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन होऊ शकेल. भुवनेश्वरने भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २२ नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नेपियर येथे खेळला होता.

पावसाचे सावट बंगळूरुमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे सामन्याच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने, आज बंगळूरुत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटाचा इशाराही दिला आहे. षटकांची संख्या कमी झाल्यास गोलंदाजांवर दबाव वाढू शकतो.