India vs West Indies 5th T20I Weather Update: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामीवर खेळवला जाणार आहे. पण या सामन्याआधीच दोन्ही संघांचं टेन्शन वाढलं आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. दरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवारी बंगळुरूत ढगाळ वातावरण असण्याचा आणि एक- दोनवेळा पाऊस पडणार असल्याचा अंदाच वर्तवण्यात आला आहे. तापमान २० ते २९ डिग्री सेल्सिअस इतकं असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण टेन्शन वाढवणारी बाब अशी की, दुपारच्या सत्रात आणि संध्याकाळी सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. पण पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. यासह षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते. पावसामुळे सामना थांबला, तरीसुद्धा अवघ्या काही मिनिटातच सामना पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. कारण चिन्नास्वामी स्टेडियमचं ड्रेनेज सिस्टम हे जगातील सर्वोत्तम ड्रेनेज सिस्टमपैकी एक आहे.
या सामन्यात पाऊस पडणं ही दोन्ही संघांसाठी टेन्शन वाढवणारी बाब आहे. कारण दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. वेस्ट इंडिजने याआधी भारतीय संघाला भारतात टी -२० मालिकेत कधीच पराभूत केलेलं नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे भारतीय संघाला पराभूत करून इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाकडे देखील मालिका खिशात घालण्याची संधी असणार आहे. लागोपाठ २ वेळा टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला वेस्ट इंडिजकडून घरच्या मैदानावर पराभूत झालेलं मुळीच आवडणार नाही, त्यामुळे भारतीय संघ पूर्ण जोर लावताना दिसून येईल.
चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा मोठा विजय
मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला होता. या सामन्यात होपने तुफान फटकेबाजी करून नाबाद शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २४७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने दमदार सुरूवात करून दिली होती. पण भारतीय संघाला हा सामना २४ धावांनी गमवावा लागला.
