मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव उन्मेश खानविलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी अस्थायी समितीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. त्यानुसार खानविलकर आणि एमसीएच्या अन्य एका सदस्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

उच्च न्यायालयाने यावर्षीच्या सुरुवातीला एमसीएचा कारभार हेमंत गोखले आणि व्ही. एम. कानडे या निवृत्त न्यायाधीशांच्या हाती सोपवला होता. मात्र त्यांचा कार्यकाळ १४ सप्टेंबर रोजी संपुष्टात आला आहे. ‘‘एक ते दोन दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच मार्गदर्शन घेण्यात येईल,’’ असे एमसीएच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

आपले स्वत:चे बँक खाते वापरू शकत नसल्यामुळे एमसीएसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. याप्रकरणी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते  सर्वोच्च पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.