चेन्नई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात भारताच्या फलंदाजीला लय गवसली, मात्र विशाल आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाजी विशेषत: फिरकी गोलंदाज लय गमावून बसलेले दिसून आले. उपांत्य फेरीसाठी आता रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय आवश्यक असलेल्या आणखी एका सामन्यापूर्वी ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.
भारताच्या आघाडीच्या फळीतील प्रत्येकाने धावा केल्या. मात्र, आव्हानाचा बचाव करताना गोलंदाजांनी झिम्बाब्वेची फलंदाजी सहज घेतल्याचे जाणवत होते. अनेक त्रुटी दिसून आल्या. क्षेत्ररक्षण सुमार होते, झेल सुटला आणि शिवम दुबेचा वापर म्हणजे निव्वळ खेळ वाटला. विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने या गोष्टी मान्य केल्या. आम्ही चेंडूने अधिक परिपूर्ण असायला हवे होते. पण, विजय तो विजयच असतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्हाला चुका सुधाराव्या लागतील. गोलंदाजीच्या आघाडीवर आम्हाला अधिक चतुराई दाखवणे आवश्यक होते. आम्हाला धाडस दाखवावेच लागेल, असे सूर्यकुमार म्हणाला.
भारताचा निर्णायक सामना रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. त्यांची आतापर्यंतची कॅरेबियन शैलीतील ताकदवान फलंदाजी पाहिली, तर गोलंदाजीतील एखादी छोटीशी चूकही महागात पडू शकते.
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अर्शदीपने चेंडू दोन्ही बाजूने स्विंग केला. हार्दिक पंड्याला पहिल्याच चेंडूवर षटकार बसला, पण नंतर त्याने पुढील ११ चेंडूंत फक्त सहा धावा दिल्या. इथेच पहिल्या चार षटकानंतर झिम्बाब्वेची आव्हानाचा पाठलाग करण्याची शक्यता मावळली होती. षटकामागे तेराची धावगती झिम्बाब्वेला आवश्यक होती. त्यानंतरही झिम्बाब्वे संघाने मोठी मजल मारली. भारत ७२ धावांनी जिंकला. गोलंदाजीची ताकद लक्षात घेता हा विजय अधिक मोठा असायला हवा होता. या विजयाने आत्मविश्वापेक्षा भारताला आव्हान राखल्याचा दिलासा मिळाला इतकेच महत्त्वाचे होते.
चिंतेचे कारण
भारताला दिलासाच मिळाला इतके म्हणण्याचे कारण म्हणजे खराब सुरुवातीनंतरही झिम्बाब्वेने ६ बाद १८४ धावांची मजल मारली. आपण झिम्बाब्वेचा डाव गुंडाळू शकलो नाही. फलंदाजी परिपूर्ण दिसून आली तरी मोठ्या खेळीबाबत भारतीय कमनशिबीच राहिले. तुलनेने बेनेटने नाबाद ९७ धावांची खेळी करून प्रभाव पाडला. वेगवान गोलंदाजांनी १० षटकांत ६६ धावा दिल्या, तर फिरकी गोलंदाजांनी आठ षटकांत ७० धावा दिल्या. विश्वचषक स्पर्धेत सामन्यात गोलंदाजी कशी नसावी अशी दोन षटके शिवम दुबेने टाकली. कदाचित गोलंदाज यापेक्षा नेटमध्ये चांगली गोलंदाजी करतात.
इतकी दुबेची गोलंदाजी वाईट होती. त्याच्या दोन षटकांत ४६ धावा निघाल्या. फिरकी गोलंदाजीत अक्षरला पुनरागमन साजरे करता आले नाही, तर वरुण डेव्हिड मिलरच्या प्रतिहल्ल्यातून अजून सावरला नसल्याचे दिसून आले. क्षेत्ररक्षणात एक-दोन वेळा चेंडू चौकार जात असताना क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहचू देखील शकत नव्हते. तेव्हा सूर्यकुमारचा चेहरा खूप काही सांगून जात होता.
झिम्बाब्वेकडे बेनेटसारखा आणखी एक फलंदाज असता, तर हा सामना नक्कीच अटीतटीचा झाला असता. प्रतिस्पर्धी दुबळा आहे म्हणून त्याला इतके सहज घेणे योग्य नाही. विश्वचषकासारख्या स्पर्धेत कुठल्याही सामन्यात प्रतिस्पध्र्यावर कशी कामगिरी करायची नसते. झिम्बाब्वेकडे दुसरा आक्रमक फलंदाज नव्हता, पण वेस्ट इंडिजचे तसे नाही. त्यांच्याकडे अखेरचा खेळाडू देखील टोलेबाजी करू शकतो हे याच स्पर्धेत दिसून आले आहे.
