कोलकाता : भारतीय फलंदाजांना सूर गवसला असला, तरी गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. अशा स्थितीत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल आठ’ फेरीतील आज, रविवारी होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीत भारताला सर्वच विभागांत कामगिरी उंचवावी लागेल.

‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागल्याने भारताचे आव्हान धोक्यात आले होते. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजला दक्षिण आफ्रिकेने नमविल्याने, तसेच भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवल्याने ‘अव्वल आठ’ फेरीतील चुरस कायम राहिली. आज कोलकाताच्या ‘इडन गार्डन्स’ येथे होणारा हा सामना भारत आणि विंडीज या दोन्ही संघांसाठी ‘करो वा मरो’चा ठरणार आहे. दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावून खेळतील.

झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फटकेबाजी केली. शीर्ष फळीत पुनरागमन करणार्‍या संजू सॅमसनसह आघाडीच्या सहा फलंदाजांनी योगदान दिले. सॅमसनने केवळ २४ धावा केल्या, पण त्याने सुरुवातीला धावगती चांगली ठेवली. त्याचा फायदा नंतर येणार्‍या फलंदाजांना मिळाला. अभिषेक शर्माने अर्धशतक साकारताना लय मिळवल्याचे संकेत दिले. तिलक वर्मानेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १६ चेंडूंत नाबाद ४४ धावा केल्या. त्यामुळे भारताने ४ बाद २५६ धावांची मजल मारली. त्यामुळे फलंदाजीतील चिंता कमी झाली असली, तरी गोलंदाजी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विंडीजसाठी ‘इडन गार्डन्स’ हे कधीही न विसरता येणारे स्टेडियम आहे. याच मैदानावर विंडीजने २०१६ मध्ये डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला होता. त्या वेळी त्यांनी उपांत्य सामन्यात भारताला नमवले होते. या वेळी विंडीजला उपांत्य फेरी गाठायची झाल्यास भारताचा अडथळा दूर करावा लागेल. योगायोग म्हणजे संघाचा प्रशिक्षकही डॅरेन सॅमी आहे.

वरुणवर लक्ष, कुलदीपलाही संधी?

’झिम्बाब्वेविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केली. जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या यांनी योगदान दिले. मात्र, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती लय गमावून बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने चार षटकांत ४७ धावा दिल्या.

’वरुणने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘शॉर्ट पिच’ चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, झिम्बाब्वेविरुद्ध त्याने चेंडू अधिक पुढे टाकत फलंदाजांना खेळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश मिळाले नाही. आता तो कामगिरीत सुधारणा करतो का, यावर सर्वांचे लक्ष असेल.

’तसेच ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कुलदीपने आतापर्यंत स्पर्धेत केवळ एकच सामना (पाकिस्तानविरुद्ध) खेळला आहे. वरुण आणि कुलदीप या दोघांनाही ‘आयपीएल’ कारकीर्दीत कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळण्याचा अनुभव आहे.

’शिवम दुबेची गोलंदाजीतील कामगिरीही संघासाठी चिंतेचा विषय आहे. झिम्बाब्वेविरुद्ध दुबेने केवळ दोन षटकांत ४६ धावा दिल्या.

वेळ : सायं. ७ वा. ल्लथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,२, १ हिंदी