India vs Zimbabwe 1st T20I Match Timing Schedule Squad: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. श्रेयस अय्यर या संघाचे नेतृत्व करणार असून, संघाचे स्वरूपही बऱ्याच अंशी वेगळे असणार आहे. श्रेयससमोर त्याच्या नेतृत्त्वाखाली पहिला टी-२० सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ जुलै रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार, जाणून घेऊया.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला असून संघाने सरावाला सुरूवात केली आहे. संजू सॅमसन या मालिकेसाठी संघाचा भाग नसल्याने वैभव सूर्यवंशी तिन्ही सामने खेळताना दिसेल, त्यामुळे इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर वैभवच्या कामगिरीवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे. याशिवाय आयर्लंड आणि इंग्लंडमधील टी-२० मालिकांमधील एकतर्फी पराभवानंतर झिम्बाब्वे मालिकेत भारताच्या संघावर विशेष लक्ष असणार आहे. आयर्लंड मालिकेत भारताला २-० आणि इंग्लंड मालिकेत ४-० असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. याशिवाय भारताला आयासीसी क्रमवारीतील पहिलं स्थान पण गमवावं लागलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकांची सांगता झाली असून, आता सर्वांचे लक्ष पुढील मालिकेवर असणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी-२० सामने खेळणार आहे. सामन्यांच्या वेळापत्रकानुसार, हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता सुरू होतील. त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच ४ वाजता नाणेफेक होईल. जर २० षटकांचा पूर्ण सामना खेळला गेला, तर तो रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संपेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे झिम्बाब्वेविरूद्ध या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यावर असणार आहे.

अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांसारखे खेळाडू झिम्बाब्वेमध्ये दाखल झाले असून मालिकेची तयारी करत आहेत. वैभव तिन्ही सामन्यांत खेळण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडमधील आपल्या आधीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या वेळी त्याला विशेष छाप पाडता आली नव्हती, परंतु आता स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी त्याला मिळाली आहे. तरीही, झिम्बाब्वेच्या खेळपट्ट्यांवर धावा करणं सोपं नसेल; त्यामुळे वैभव आणि भारतीय संघातील इतर फलंदाज तिथल्या परिस्थितीशी कशा प्रकारे जुळवून घेतात, हे महत्त्वाचं ठरेल.

हरारेच्या संथ खेळपट्टीवर फलंदाजांची लागणार कसोटी

बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात हल्लीच तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्या आली होती. यापैकी कोणत्याही सामन्यात २०० धावांचा टप्पा गाठला गेला नाही; किंबहुना, केवळ एकाच सामन्यात धावसंख्या १८० च्या पुढे गेली. झिम्बाब्वेने मालिकेतील पहिला सामना जिंकला होता, तरी बांगलादेशने जोरदार पुनरागमन करत उर्वरित दोन सामने जिंकले आणि मालिका आपल्या नावे केली. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील आगामी मालिकेचे सामने हरारे येथे खेळवले जातील.

झिम्बाब्वे टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंह, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, रवी बिश्नोई.