हरारे : आयर्लंड-इंग्लंड दौर्यातील अपयशाला मागे सारत विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज, गुरुवारपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणार्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. श्रेयस अय्यरसाठी ही मालिका नेतृत्वाची महत्त्वाची परीक्षा मानली जात असून, नवोदित खेळाडूंनी सजलेल्या भारतीय संघाकडून प्रभावी पुनरागमनाची अपेक्षा आहे.
ट्वेन्टी-२० विश्वविजयाच्या काही महिन्यांतच अजित आगरकर यांच्या निवड समितीने कठोर निर्णय घेताना सूर्यकुमार यादवला संघाबाहेर करून कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयसकडे सोपवली. ‘आयपीएल’मध्ये यशस्वी नेतृत्व केलेल्या श्रेयसला आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र पहिल्या दौर्यात झगडावे लागले. श्रेयसच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्या सात ट्वेन्टी-२० सामन्यांपैकी सहामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. आयर्लंड आणि इंग्लंड येथील दोनही मालिका भारताने गमावल्या. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत कामगिरी उंचावण्याचे भारतीय संघाचे ध्येय असेल.
प्रशिक्षकपदी लक्ष्मण
या दौर्यासाठी नियमित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाला मार्गदर्शन करतील. गंभीरच्या तुलनेत लक्ष्मण कमी प्रयोगशील असून ते संतुलित संघरचनेला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. या मालिकेत सर्वाधिक लक्ष १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीवरच असेल. संजू सॅमसनची निवड न झाल्याने वैभवला संधी मिळेल.
गोलंदाजांना मदत
या मालिकेतील तीनही सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे रंगणार आहेत. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. ब्लेसिंग मुझराबानी आणि रिचर्ड एनगरावा या उंचपुर्या वेगवान गोलंदाजांवर झिम्बाब्वेची भिस्त असेल. सीम आणि उसळीचा फायदा घेणार्या या जोडीसमोर भारतीय फलंदाजांचा कस लागू शकेल.
* वेळ : सायंकाळी ४.३० वा.
* थेट प्रक्षेपण : ‘युनाइट ८ स्पोर्ट्स’, ‘झी ५’ , फॅनकोड ॲप.
प्रतिस्पर्धी संघ
* भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा,
शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव,
मयांक यादव, अशोक शर्मा,
रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, रिंकू सिंह. * झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली माधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, तफादझ्वा सिगा, वेलिंग्टन मसाकाद्झा, ब्लेसिंग मुझराबानी, डिऑन मायर्स, रिचर्ड एनगरावा, न्यूमन न्याम्हुरी, मिल्टन शुंबा.
