Sunil Gavaskar On Team India: भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. पण भारतीय संघातील खेळाडू हवं ते क्षेत्ररक्षण करू शकले नाहीत. भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणावरुन भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केली आहे. यासह त्यांनी निवडकर्त्यांना सल्ला दिला आहे. सुनील गावसकरांच्या मते, जो चांगलं क्षेत्ररक्षण करत नाही त्याला संघाबाहेर करायला हवं.

सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्सस्टारच्या कॉलममध्ये लिहिले की, “जर एखादा खेळाडू सरासरी दर्जाचा क्षेत्ररक्षक असेल, तर त्याला संघाबाहेर करणं अत्यंत गरजेचं आहे. चेंडू त्यांच्याकडे जाणारच नाही, अशी अपेक्षा करून कर्णधाराने संघातील ३ किंवा ४ खेळाडूंना मैदानात लपवून ठेवणं अजिबात योग्य नाही.”

तसेच त्यांनी खेळाडूंच्या गेम अवेअरनेसवरुनही टीका केली. भारतीय संघाला गेल्या काही सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याआधी इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या भारतीय संघाला ४-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तर आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. झिम्बाब्बेविरुद्ध खेळताना भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला. पण त्याआधी झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय खेळाडू १८३ आणि १५५ धावांचा पाठलाग करु शकले नव्हते.

सुनील गावसकरांनी पुढे लिहिले की, “योग्यवेळी योग्य शॉट मारणं खूप गरजेचं असतं. अशावेळी फलंदाजाला आपल्या ईगोवर नियत्रंण ठेवावे लागत आणि चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळावे लागते. टी-२० फॉरमॅटमध्ये असं करणं मुळीच सोपं नसतं. कारण या फॉरमॅटमध्ये प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज असते. मात्र, वनडे फॉरमॅटमध्ये परिस्थिती वेगळी असते. या फॉरमॅटमध्ये मोठे फटके मारण्यापूर्वी मैदानात थोडे सेटल होण्यासाठी वेळ मिळतो.”

यासह सुनील गावसकर यांनी बीसीसीआयला एक सल्ला देखील दिला आहे. त्यांनी बाऊंड्री साईज वाढवण्याचा सल्ला दिला आहे. २०२७ चा वनडे वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. भारतीय खेळाडूंना मोठ्या मैदानांवर खेळण्याची सवय व्हावी म्हणून, सुनील गावसकरांनी हा सल्ला दिला आहे. आता बीसीसीआय हा सल्ला ऐकणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.