India-w vs Australia-w Highlights: नवी मुंबईतील डी. वाय.पाटीलचं मैदान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेीतील सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ. एक संघ आयसीसीच्या बाद फेरीतील सामने कधीच हरतो नसतो, असा रेकॉर्ड असलेला संघ. तर दुसरा संघ घरच्या मैदानावर वर्ल्डकप सेमीफायनल खेळत असलेला संघ. त्यामुळे सामना रोमांचक होणार, याची १०१ टक्के शक्यता होती. ऑस्ट्रेलियाने हाती आलेला सामना सोपे झेल टाकून हातून घालवला आणि शतक झळकावणारी जेमिमा रॉड्रिग्ज भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आणि जेतेपदाचा मान पटकावला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ घरी परतला. आता नवी मुंबईपासून ७२९७ किमी दूर असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला आहे.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. भारतीय संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. ६ गुणांवर असलेल्या भारतीय संघाला सेमीफायनल गाठण्यासाठी कुठल्याही स्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. पण भारताला हा सामना ६ गडी राखून गमवावा लागला आहे. यासह भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि शफाली वर्माने दमदार सुरुवात करुन दिली. शफालीने ३४, तर स्मृतीने ३८ धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ३४ धावा केल्या. शेवटी हरमनप्रीत कौरने लागोपाठ ३ षटकार खेचून अवघ्या २५ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हरमनप्रीतने २७ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १७० धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १७१ धावा करायच्या होत्या. याआधी आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कुठल्याही संघाने इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला इतिहास घडवायचा होता. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. पण शेवटी एलिस पेरीने ५६ आणि अॅशले गार्डनरने नाबाद ५३ धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाला बाहेर केलं आहे.