India W vs Pakistan W Highlights: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. पण महिलांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ नेहमीच पाकिस्तानवर भारी पडला आहे. भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. एजबस्टनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. फलंदाजांनी आपली भूमिका योग्यरित्या पार पाडल्यानंतर गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली.भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने अवघ्या १० धावा खर्च करुन ५ गडी बाद केले. यासह पाकिस्तानचा डाव अवघ्या १०६ धावांवर आटोपल. भारताने हा सामना ६४ धावांनी आपल्या नावावर केला.

दीप्ती शर्माची दमदार गोलंदाजी

पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १७१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला चांगली सुरुवात मिळाली होती. मुनीबा अलीने ४१ धावा केल्या. तर गुल फेरोजाने १२ धावांचे योगदान दिले. पण त्यानंतर विकेट्स पडायला सुरुवात झाली. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर पाकिस्तानला हवा तसा शेवट करता आला नाही. दीप्ती शर्माने आधी रॉकेट थ्रो मारुन मुनीबा अलीला बाद केलं. त्यानंतर गोलंदाजी करताना तिने एका पाठोपाठ एक ५ फलंदाजांना माघारी धाडलं. या डावात तिने ४ षटकात अवघ्या १० धावा खर्च करुन ५ गडी बाद केले.

भारतीय संघाने केल्या १७० धावा

या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले. आधी शफाली वर्मा आणि त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून ९१ धावांची भागीदारी केली. यादरम्यान स्मृती मानधनाने ६८ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने ३६ धावांची खेळी केली. शेवटी ऋचा घोषने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. तिने शेवटी फलंदाजीला येऊन १७ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ६ गडी बाद १७० धावा केल्या.

दीप्ती शर्माने धावांचा बचाव करताना एका पाठोपाठ एक असे ५ मोठे धक्के दिले. तिने आपल्या स्पेलदरम्यान गुल फेरोजा, आयेषा जफर, आलिया रियाज, नश्र संधु आणि तस्मिया रुबाबला बाद करत माघारी धाडलं. यादरम्यान तिने ४ षटकात अवघ्या १० धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले. या दमदार कामगिरीच्या बळावर तिने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला.