वृत्तसंस्था, पोर्ट ऑफ स्पेन : कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवनच्या (९७ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ५० षटकांत ७ बाद ३०८ अशी धावसंख्या उभारली. क्वीन्स पार्क ओव्हलवर झालेल्या या सामन्यात विंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत युवा शुभमन गिलला डावखुऱ्या धवनच्या साथीने सलामीला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना गिलने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने ६४ धावांची खेळी केली. त्याने आणि धवनने ११९ धावांची सलामी दिली.

मग धवनने श्रेयस अय्यरसोबत ९४ धावांची भागीदारी रचली. अय्यरने ५७ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ५४ धावा केल्या. धवनचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने ९९ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ९७ धावांची खेळी केली. या दोघांनाही डावखुरा फिरकीपटू गुदाकेश मोटीने बाद केले. त्यानंतर विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले. त्यामुळे भारताला अखेरच्या १० षटकांत ६० धावाच करता आल्या. दीपक हुडा (२७) आणि अक्षर पटेल (२१) यांनी काहीसे योगदान दिले.

दुखापतग्रस्त जडेजा दोन सामन्यांना मुकणार

भारताचा तारांकित अष्टपैलू रवींद्र जडेजाला उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांना मुकावे लागणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या सुरुवातीला ‘बीसीसीआय’ने याबाबतची माहिती दिली. त्याला ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय चमूच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे विंडीजचा अष्टपैलू जेसन होल्डरला करोनाची बाधा झाल्यामुळे पहिल्या सामन्यातून माघार घेणे भाग पडले.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ७ बाद ३०८ (शिखर धवन ९७, शुभमन गिल ६४, श्रेयस अय्यर ५४; गुदाकेश मोटी २/५४, अल्झारी जोसेफ २/६१) वि. वेस्ट इंडिज.