भारतीय संघ या वर्षाअखेरीस फारच व्यस्त राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या भारताचे दोन संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिज दौरा, ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आणि टी २० विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघाला तयार रहावे लागणार आहे. त्यात आता आणखी एका दौऱ्याची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियातील टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघ तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने (न्यूझीलंड क्रिकेट) आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

“वेलिंग्टन, तौरंगा आणि नेपियर येथे तीन टी २० आणि ऑकलंड, हॅमिल्टन आणि क्राइस्टचर्च येथे तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारत न्यूझीलंड दौरा करेल. टी २० विश्वचषकाच्या समारोपानंतर हा दौरा असेल,” असे न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे. भारताचा सहा सामन्यांचा हा दौरा १८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंडचा संघ पुन्हा भारतामध्ये येणार आहे.

“भारताचा न्यूझीलंड दौरा झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौर्‍यासाठी रवाना होईल. पाकिस्तान दौऱ्या पाठोपाठ न्यूझीलंडचा संघ भारतातही टी २० आणि एकदिवसीय मालिका खेळेल,” असेही क्रिकेट न्यूझीलंडने सांगितले आहे.

हेही वाचा – ऑलिंपिक पदक विजेता हॉकीपटूचे निधन; ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने झाला होता सन्मान

दरम्यान, न्यूझीलंडने नुकताच इंग्लंड दौरा पूर्ण केला आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किवींना ३-०ने परावभ स्वीकारावा लागला आहे. तर, सध्या भारतीय कसोटी संघही आपली अर्धवट राहिलेली कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. १ ते ५ जुलै या काळात एजबस्टन येथे भारत आणि इंग्लंडचा पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक

१८ नोव्हेंबर – पहिला टी २० सामना – स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
२० नोव्हेंबर २० – दुसरा टी २० सामना – बे ओव्हल, माउंट मौनगानुई
२२ नोव्हेंबर – तिसरा टी २० सामना – मॅक्लेन पार्क, नेपियर
२५ नोव्हेंबर – पहिला एकदिवसीय सामना – ईडन पार्क, ऑकलंड
२७ नोव्हेंबर – दुसरा एकदिवसीय सामना – सेडन पार्क, हॅमिल्टन
३० नोव्हेंबर – तिसरा एकदिवसीय सामना – हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च