IND vs SL : दीपक चहर ठरला ‘बाजीगर’..! टीम इंडियानं दुसरी वनडे जिंकली

दीपक चहरनं झुंजार खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

india wins second odi against sri lanka and seal the series 2-0
दुसऱ्या वनडेत भारताची श्रीलंकेवर मात
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३ गडी राखून विजय मिळवला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि असालांका यांची अर्धशतके आणि तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने ४४ धावांचे योगदान दिल्यामुळे श्रीलंकेने ५० षटकात ९ बाद २७५ धावा केल्या. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९३ धावांवर ७ गडी गमावल होते. सूर्यकुमारने आपले पहिलवहिले वनडे अर्धशतक ठोकले. तो बाद झाल्यानंतर भारत पराभवाच्या छायेत सापडला होता. मात्र, भारताचा फलंदाज दीपक चहर आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमार लंकेसाठी डोकेदुखी ठरले. दीपकने झुंजार अर्धशतकी खेळी करत भुवनेश्वरसोबत ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. चिवट फलंदाजीमुळे या दोघांनी लंकेच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला. चहरला सामनावीर पुरस्कार मिळाला. भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताचा डाव

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. मागील सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळालेला पृथ्वी शॉ या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हसरंगाने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. पृथ्वीला फक्त १३ धावा करता आल्या. पृथ्वी शॉनंतर मैदानात आलेला इशान किशनही काही खास करू शकला नाही. वैयक्तिक एक धाव केल्यानंतर रजिथाने त्याला माघारी धाडले. टीम इंडियाच्या अर्धशतकानंतर कर्णधार धवनला हसरंगाने पायचित पकडले. धवनने ६ चौकारांसह २९ धावा केल्या. धवननंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादव यांनी १६व्या षटकात टीम इंडियाचे शतक फलकावर लावले. १८व्या षटकात मनीष पांडे धावबाद झाला. शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने सरळ चेंडू मारला. हा चेंडू शनाकाच्या हाताला लागून यष्ट्यांवर आदळला. मनीष पांडेने ३ चौकारांसह ३७ धावा केल्या. मनीषनंतर आलेला हार्दिक पंड्या शून्यावर माघारी परतला. २७व्या षटकात सूर्यकुमार यादवने आपले पहिले एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक करून सूर्यकुमार बाद झाला. संदाकनने सू्र्यकुमारला पायचित पकडले. सू्र्यकुमारने ६ चौकारांसह ५३ धावा केल्या. सूर्यकुमारनंतर कृणाल पंड्या भारताला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण तो ३५ धावा काढून बाद झाला.

दीपक-भुवनेश्वर चमकले

सूर्यकुमार-कृणाल बाद झाल्यानंतर दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने सामन्याचा मोर्चा सांभाळला. कधी नशिबाची साथ, एकेरी-दुहेरी धावा, आक्रमक फटके यांच्या जोरावर दीपक चहरने आपले वनडे क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण कले आहे. त्याने भुवनेश्वर कुमारसोबत चिवट फलंदाजी करत नाबाद ८४ धावांची विजयी भागीदारी केली. चहरने ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६९ आणि भुवनेश्वरने नाबाद १९ धावा केल्या. लंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ बळी घेतले.

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेकडून मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी फलंदाजीच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी दमदार सलामी देत आठव्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मागच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी कलेला फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल पुन्हा एकदा भारतासाठी धावून आला. त्याने मिनोद भानुकाला वैयक्तिक ३६ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर याच षटकात चहलने भानुका राजपक्षाला शून्यावर बाद केले. इशान किशनने राजपक्षाचा झेल टिपला. त्यानंतर अविष्का फर्नांडोने धनंजय डि सिल्वासोबत भागीदारी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो अर्धशतक केल्यानंतर माघारी परतला. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. फर्नांडोने ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. दीपक चहरने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या धनंजय डि सिल्वाला कर्णधार धवनकरवी झेलबाद केले. डि सिल्वाने ३२ धावांचे योगदान दिले. चहलने पुन्हा गोलंदाजीला येत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची दांडी गुल केली. शनाकाने १६ धावा केल्या. मधल्या फळीत असालांकाने ६ चौकारांसह ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. भुवनेश्वर कुमारने  त्याला बाद केले. ५०व्या षटकात भुवनेश्वरने दुश्मंता चमिरा आणि लक्षण संदानकनला बाद केले. लंकेचा तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने धावांचे योगदान दिल्यामुळे लंकेला पावणेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. शेवटच्या दोन चेंडूवर करुणात्नेने दोन चौकार खेचले. करुणारत्नेने ५ चौकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी केली. भारताकडून चहल आणि भुवनेश्वरला प्रत्येकी ३ बळी घेता आले. दीपक चहरने २ बळी टिपले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India wins second odi against sri lanka and seal the series 2 0 adn