India Women Asia Cup 2026 Trophy Mohsin Naqvi controversy: भारताच्या महिला क्रिकेट संघाने आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत आठव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. मात्र तरीही भारताला विजयी चषक मिळू शकला नाही. कारण ठरले आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी. हे तेच आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय पुरुष संघाने जेतेपद पटकावल्यानंतर चषक घेऊन मैदानातून पळ काढला होता. यंदाही त्यांनी आडमुठेपणा सोडला नाही. त्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्याने नक्वींचे कौतुक केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा अविर्भावात नक्वी वावरत असल्याचे दिसत आहे.

सामन्यानंतर काय झाले?

भारताच्या महिला संघाने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर बक्षीस वितरण समारंभाला जवळपास ४५ मिनिटे लागली. मोहसीन नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका बीसीसीआयने घेतली होती. नक्वी यांना दोन पर्यायही देण्यात आले होते. मात्र त्यांनी बीसीसीआयचा प्रस्ताव फेटाळून लावला. यानंतर नक्वी यांच्याकडून श्रीलंकेच्या कर्णधार चमारी अटापट्टू यांना धनादेश आणि पंचांना स्मृतीचिन्ह दिले गेले. चमारी अटापट्टूने प्रेझेंटरशी संवाद साधल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा अधिकृतरित्या संपला.

पाकिस्तानी चाहत्याकडून नक्वींचं कौतुक

सोहळा संपल्यानंतर मोहसीन नक्वी आपल्या सहकाऱ्यांसह मैदानाबाहेर जाताना दिसले. ते गाडीत बसल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक पाकिस्तानी चाहता त्यांच्याजवळ येऊन म्हणतो, “तुम्ही जे केले ते बरोबरच केले. भारतीय संघ चषकाच्या लायक नाही. आम्हाला तुमचा अभिमान आहे. मोहसीन नक्वी जिंदाबाद”

पाकिस्तानी चाहत्याने कौतुक केल्यानंतर मोहसीन नक्वी गालातल्या गालात हसताना दिसत आहेत. जणू काही त्यांनी योग्यच केल्याचे त्यांना सुचवायचे आहे. यानंतर ते चाहत्यांना हात जोडून अभिवादन करत तिथून निघून जातात.

भारतीय चाहत्यांकडून घोषणाबाजी

दरम्यान या सामन्यातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सादरीकरणानंतर मोहसीन नक्वी मैदानातून निघून जात असताना भारतीय चाहत्यांकडून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही तरुण ‘ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर’, अशी घोषणाबाजी करताना दिसतात.

भारताकडून दुसऱ्यांदा नकार

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त केले. हे ऑपरेशन अद्याप सुरूच असल्याचे भारतीय सैन्यदलाने वारंवार स्पष्ट केले आहे.

Asaduddin Owaisi statement India vs Pakistan cricket controversy
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांशी क्रिकेट कशाला खेळता? ट्रॉफीच्या वादानंतर असदुद्दीन ओवैसींची टीका

या पार्श्वभूमीवर सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या पुरुष संघाच्या आशिया चषक स्पर्धेत हँड शेक वाद झाला. त्यापाठोपाठ भारताने जेतेपद पटकावल्यानंतर मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास पहिल्यांदा नकार दिला. त्यानंतर त्याची पुनरावृत्ती यंदा पुन्हा एकदा पाहायला मिळाली.