Women’s World Cup 2025 Final : कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने १९८३ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटचे रूपडे पालटले होते. आता अशीच काहीशी कामगिरी करण्याची संधी भारताच्या महिला संघाला मिळाली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर असून आज, रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. विशेष म्हणजे, दोनही संघ आपल्या पहिल्या विश्वविजयासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार हे निश्चित आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांनी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील आपल्या तिसऱ्या प्रयत्नात जेतेपदाची प्रतीक्षा संपवली होती. काहीशी अशीच स्थितीत भारताच्या महिला संघाची आहे. भारताने यापूर्वी मिताली राजच्या नेतृत्वाखाली २००५ आणि २०१७ मध्ये विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता घरच्या मैदानांवर खेळताना प्रेक्षकांच्या पाठिंब्याने भारतीय संघ प्रथमच विश्वचषक उंचावेल अशी आशा बाळगली जात आहे.
भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले. साखळी फेरीत भारताने सातपैकी तीन सामने जिंकले, तीन गमावले, तर त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला. उपांत्य सामन्यात त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विक्रमी विजयाची नोंद केली. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने सातपैकी पाच साखळी सामने जिंकले. मग उपांत्य सामन्यात त्यांनी इंग्लंडला धूळ चारली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३३ एकदिवसीय सामने झाले आहेत. यात २० विजयांसह भारताचे पारडे जड आहे. मात्र, विश्वचषकात दोन्ही संघांनी समान तीन-तीन सामने जिंकले आहेत. भारताने २०१७ पासून ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये आफ्रिकेला पराभूत केलेले नाही. त्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला परतफेड करण्यासाठी उत्सुक असेल. यंदाच्या स्पर्धेत विशाखापट्टणम येथे झालेल्या साखळी लढतीत दक्षिण आफ्रिकेने भारताला तीन गडी राखून पराभूत केले होते.
यंदाचा अंतिम सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर भारताने दोन विजय मिळवले आहेत, तर बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे होऊ शकली नाही. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाचव्यांदा यजमान संघ अंतिम सामना खेळेल. ऑस्ट्रेलिया (१९८८), इंग्लंड (१९९३, २०१७) आणि न्यूझीलंड (२०००) यांनी जेतेपद मिळवण्याची कामगिरी केली होती. आता भारतीय संघ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय पुरुष संघाचे घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. आता महिला संघ आपले स्वप्न पूर्ण करेल अशीच चाहत्यांना आशा आहे.
या खेळाडूंकडे लक्ष
स्मृती मनधाना : भारताला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी ही तारांकित सलामीवीर स्मृती मनधानाच्या खांद्यावर असेल. स्मृती ३८९ धावा करीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निराशाजनक सुरुवातीनंतर तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८० आणि इंग्लंडविरुद्ध ८८ धावांची खेळी केली. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध १०९ धावा करीत निर्णायक भूमिका पार पाडली. अंतिम सामन्यातही तिच्याकडून अपेक्षा असणार आहेत.
जेमिमा रॉड्रिग्ज : उपांत्य फेरीत निर्णायक १२७ धावांच्या खेळीनंतर जेमिमा रॉड्रिग्जकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मध्यक्रमातील भरवशाची फलंदाज म्हणून जेमिमाकडे पाहिले जात आहे. उपांत्य सामन्यात हरलीन देओल संघात नव्हती. त्यामुळे जेमिमाला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचे तिने सोने केले. त्याआधी तिने न्यूझीलंडविरुद्ध ७६ धावांची खेळी केली होती. आता अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर जेमिमाला पुन्हा एकदा दबावात कामगिरी उंचवावी लागेल. जेमिमाने आतापर्यंत २६८ धावा केल्या आहेत.
हरमनप्रीत कौर : भारताकडे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रुपात मोठ्या सामन्यांत कामगिरी उंचावणारी खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कठीण स्थितीतून भारताला बाहेर काढताना हरमनप्रीतने ८९ धावांची खेळी केली होती. तिने त्याआधी इंग्लंडविरुद्ध ७० धावांची खेळी केली. इतर सामन्यांमध्ये मात्र तिला फारशी चमक दाखवता आली नाही. स्पर्धेतील आठ सामन्यांत तिच्या नावे २४० धावा आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे गुणवान फिरकी गोलंदाज असून त्यांच्याविरुद्ध हरमनप्रीतची भूमिका महत्त्वाची ठरेल.
लॉरा वोल्वार्ड : दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्या नेतृत्वगुणासह फलंदाजीतही चुणूक दाखवली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती अग्रस्थानी असून तिने आठ सामन्यांत ६७.१४च्या सरासरीने ४७० धावा केल्या आहेत. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध तिने १४३ चेंडूंत १६९ धावांची शानदार खेळी साकारली. त्याआधी तिने पाकिस्तानविरुद्ध (९०), श्रीलंकेविरुद्ध (६०) आणि भारताविरुद्ध (७०) अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे भारतासमोर तिला लवकर बाद करण्याचे आव्हान असेल.
नदीन डी क्लर्क : नदीन डी क्लर्कने भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात अखेरच्या क्षणी खेळ उंचावत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता. तिच्यात मोठे फटके मारण्याची क्षमताही असल्याने ती सामन्याचे चित्र कधीही पालटू शकते. भारताविरुद्ध तिने ५४ चेंडूंत नाबाद ८३ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे तिच्यापासून भारताला सावध राहावे लागेल.
मारिझान काप : दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मारिझान कापचेही आव्हान भारतीय खेळाडूंपुढे असेल. कापने आतापर्यंत १२ बळी मिळवण्यासह २०४ धावा केल्या आहे. भारताविरुद्ध कापने नेहमीच प्रभावी कामगिरी केली आहे. उपांत्य लढतीत इंग्लंडविरुद्ध तिने चमकदार कामगिरी केली होती. तिने गोलंदाजीत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला आणि त्याआधी फलंदाजीत ४२ धावांचे योगदान दिले. त्याआधी पाकिस्तानविरुद्ध नाबाद ६८ धावा आणि तीन बळी मिळवण्याची कामगिरीही तिने केली होती.
संघ
दक्षिण आफ्रिका : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताझ्मिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता (यष्टिरक्षक), काराबो मेसो (यष्टिरक्षक), अॅनेके बॉश, नदीन डी क्लर्क, अॅनेरी डेर्कसेन, मारिझान काप, सुने लस, नॉन्डुमिसो शांगासे, क्लोई ट्रायॉन, अयाबोंगा खाका, मासाबाता क्लास, नोनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मनधाना (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टिरक्षक), उमा चेत्री (यष्टिरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, शफाली वर्मा, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव.
महिला संघाला पुरुषांइतकेच बक्षीस?
भारतीय महिला संघाने रविवारी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत जेतेपद मिळवले, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करू शकते. ‘बीसीसीआय’चे माजी सचिव आणि सध्याचे ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा यांच्या ‘समान वेतन’ नीतिनुसार गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला जितकी रक्कम दिली, तितकीच रक्कम महिला संघालाही देण्याचा विचार ‘बीसीसीआय’ पदाधिकारी करीत आहेत. भारतीय पुरुष संघाला विश्वचषक जिंकल्यानंतर १२५ कोटीची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती.
अंतिम रेषा पार करण्यास उत्सुक हरमनप्रीत
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आम्ही याआधी पराभवाचा सामना केला आहे. आता अंतिम रेषा पार करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली. ‘‘पराभूत झाल्यानंतर भावना कशा असतात, याची कल्पना मला आहे. आता जेतेपद मिळवल्यानंतर आनंद घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ज्या पद्धतीने आम्ही गेले दोन सामने खेळले, ते पाहून संपूर्ण देशाला आमचा अभिमान वाटला असेल. हा मोठा सामना आहे आणि या संधीचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे,’’ असे हरमनप्रीतने सांगितले.
पावसाचे सावट
नवी मुंबईत रविवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसामुळे रविवारी सामना झाला नाही, तर सोमवारी राखीव दिवशी खेळ होईल.
तिकिटे न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी
● उपांत्य सामन्यातील भारताच्या विजयानंतर अंतिम सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मात्र, तिकीट न मिळाल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली.
● उपांत्य सामन्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये चांगली गर्दी केली होती. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी बाद फेरीच्या तिकिटांची किंमत १५० आणि २५० रुपये अशी ठेवण्यात आली होती.
● भारतीय संघाने अंतिम फेरी गाठल्यानंतर ही तिकिटे झटपट संपली. शनिवारी दुपारपर्यंत तिकिटे उपलब्धच नव्हती. त्यामुळे अनेकांना निराशेने माघारी परतावे लागले.
●वेळ : दुपारी ३ वा. ●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.
