थिरुवनंतपुरम : पहिल्या तीन सामन्यांत विजय मिळवत मालिका याआधीच आपल्या नावे केलेला भारतीय महिला संघ आज, रविवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या चौथ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत आपले वर्चस्व राखले आहे. श्रीलंकेला भारतासमोर कुठलेच आव्हान उपस्थित करता आलेले नाही.
भारतीय संघ मालिकेत ३-० अशा आघाडीवर आहे. यजमानांनी तीनही सामन्यांत आव्हानाचा पाठलाग करीत विजय साकारला. कुठल्याही सामन्यात भारताने १४.४ षटकांच्या पुढे फलंदाजी केली नाही. त्यांनी तीनहून अधिक फलंदाजही गमावले नाहीत. तसेच, १२९हून अधिकचे लक्ष्यही त्यांना मिळाले नाही. भारताच्या या यशाचे श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्माने दोन सामन्यांत चार फलंदाजांना बाद केले. तर, रेणुका सिंह ठाकूरने तिसऱ्या सामन्यात चार फलंदाजांना माघारी धाडले.
भारताने तीनही सामन्यांत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्याला फायदा घेतला. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला ४० हून अधिक धावा करता आलेल्या नाहीत. भारतीय संघ व्यवस्थापनाकडून मालिकेत अनेक बदल केले गेले. अरुंधती रेड्डीने पहिल्या दोन सामन्यांत सहभाग नोंदवला. तर, पुढील सामन्यात रेणुकाला स्थान देण्यात आले.
भारतीय फलंदाजांची गोलंदाजांना चांगली साथ मिळाली आहे. शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्जने अर्धशतकी खेळी करत लय कायम राखली आहे. मात्र, स्मृती मनधानाला अजूनही सूर गवसलेला नाही. तिने तीन सामन्यांत ४० धावाच केल्या आहेत. त्यामुळे मनधाना मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल.
भारतीय संघ व्यवस्थापन या सामन्यात युवा फलंदाज गुनालन कमलिनी आणि हरलीन देओल यांना संधी देते का, हे पहावे लागेल. दुसरीकडे, अनुभवी चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाला कुठल्याच विभागात प्रभाव पाडता आलेला नाही. अटापट्टूशिवाय संघात हसिनी परेरा, कविशा दिलहारी आणि हर्षित समरविक्रमासारख्या खेळाडू आहे. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे या सामन्यात आव्हान उपस्थित करायचे झाल्यास श्रीलंकेच्या फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल.
वेळ : सायं ७ वा. थेट
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, जिओहॉटस्टार ॲप.
