Harmanpreet Kaur No Handshake With Pakistan Captain: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील ६ वा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यातही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नो हँडशेकची भूमिका घेतली आहे. ज्यावेळी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी आले, त्यावेळी हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने फातिमा सनाकडे दुर्लक्ष केलं आणि थेट मेल जोन्स यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या गेल्या काही सामन्यांमध्ये नो हँडशेक ट्रेंड पाहायला मिळाला आहे. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. पण त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हात मिळवला नव्हता. सामन्यानंतर खेळाडूंनीही हस्तांदोलन करणं टाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या सर्व भारत- पाकिस्तान सामन्यांमध्ये खेळाडूंनी हस्तांदोलन करणं टाळलं आहे. आता टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही हरमनप्रीत कौरने फातिमा सनासोबत हात मिळवलेला नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. पावरप्लेमध्येच भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले आहेत. सलामीला आलेली शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज हे दोघेही स्वस्तात माघारी परतले आहेत.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमली, ऋचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड
पाकिस्तान महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): गुल फेरोझा, मुनीबा अली (यष्टिरक्षक), आयेशा जफर, सायरा जबीन, आलिया रियाज, नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), रामीन शमीम, नशरा संधू, तस्मिया रुबाब, सादिया इक्बाल
