श्रीलंकेविरुद्ध अखेरचा ट्वेन्टी-२० सामना आज

डाम्बुला : सलग दोन विजयांसह मालिकेत विजयी आघाडी मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचे सोमवारी श्रीलंकेविरुद्ध अखेरचा ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना जिंकत निर्भेळ यश संपादण्याचे लक्ष्य असेल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने यजमान श्रीलंकेला पहिल्या सामन्यात ३४ धावांनी नमवले, तर दुसऱ्या लढतीत पाच गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. या विजयांमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. यंदा राष्ट्रकुलमध्ये पहिल्यांदाच महिला ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध भारताच्या दोन्ही विजयांमध्ये गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, त्यांच्या फलंदाजांना मोठय़ा खेळी करता आलेल्या नाहीत. तसेच क्षेत्ररक्षणातही भारताने निराशा केली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात कामगिरीत सुधारणेचा भारतीय खेळाडूंचा मानस असेल. गेल्या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधना (३९) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद ३१) यांनी संघाच्या विजयात योगदान दिले.

दुसरीकडे, श्रीलंकेला आता अखेरचा सामना जिंकण्यासाठी सांघिक खेळ करणे गरजेचे आहे.

वेळ : दुपारी २ वा.

थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप