डाम्बुला : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात विजयी प्रारंभासाठी उत्सुक आहे.

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ट्वेन्टी-२० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ‘आयसीसी’ महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाही केवळ आठ महिन्यांच्या अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय संघाचा प्रयत्न सर्वोत्तम कामगिरीचा असेल. या वर्षी झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे.

भारतीय संघ पहिल्यांदाच माजी फलंदाज मिताली राजशिवाय मैदानात उतरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तिने आपल्या २३ वर्षांच्या कारकीर्दीनंतर निवृत्ती जाहीर केली. कर्णधार हरमनप्रीतला या मलिकेमध्ये विक्रम रचण्याची संधी आहे. तिने १२१ ट्वेन्टी-२० सामन्यांत २३१९ धावा केल्या असून मितालीचा धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी तिला ४६ धावांची आवश्यकता आहे.

उपकर्णधार स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकार यांची लय पाहता त्यांच्याकडून संघाला योगदानाची अपेक्षा असणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या मालिकेत त्यांचा प्रयत्न चमकदार कामगिरीचा असेल. त्यांची भिस्त ओशादी रणसिंघे आणि चमारी अटापट्टू या अनुभवी खेळाडूंवर असणार आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्ध एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात १८ धावांनी पराभव झाला होता.

माजी कर्णधार रुमेली धरची निवृत्ती

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार रुमेली धरने बुधवारी खेळाच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. तिने आपल्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावरून निवृत्तीची माहिती दिली.

‘‘पश्चिम बंगालच्या श्यामनगर येथून सुरू झालेला २३ वर्षांचा क्रिकेट प्रवास आज संपुष्टात येणार आहे. मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर करत आहे,’’ असे धरने म्हटले आहे. रुमेलीने चार कसोटी सामन्यांत २३६ धावांसह आठ बळीही मिळवले आहेत. याचप्रमाणे ७८ एकदिवसीय सामन्यांत तिने ९६१ धावा करत ६३ बळी मिळवले, तर १८ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १३१ धावांसह १३ फलंदाजांना बाद केले आहे. २००५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या संघात रुमेलीचाही सहभाग होता.