India Womens vs Bangladesh Womens, Asia Cup 2026 Semi Final: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना शफाली वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोषने दमदार शेवट करत भारतीय संघाची धावसंख्या १४९ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनीही पूर्ण जोर लावला. पण बांगलादेशला १०९ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने हा सामना ४० धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. स्मृती मानधना अवघ्या २ धावा करून माघारी परतली. त्यानंतर शफाली वर्मा आणि प्रतिका रावलने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. प्रतिकाने २० तर शफालीने ६४ धावांची खेळी केली. शेवटी हरमनप्रीत कौरने २४ आणि ऋचा घोषने २१ धावांची खेळी करून हातभार लावला. त्यांतर दीप्ती शर्माने शेवटी फलंदाजी करताना १ चौकार आणि १ षटकाराचा साहाय्याने १३ धावा करून संघाची धावसंख्या १४९ धावांवर पोहोचवली. यासह बांगलादेशसमोर १५० धावांचे आव्हान ठेवलं.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १५० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिलारा अख्तरने २१ धावांची खेळी केली. तर जुआइरिया फर्दूसने १४ धावा केल्या. शोभना मोस्तारीने १८ धावा केल्या. कर्णधार निगार सुलतानाने १९ धावांचे योगदान दिले. पण बांगलादेशाल १०९ धावांपर्यंत मजल मारता आली.

अंतिम सामना केव्हा होणार?

या विजयासह भारतीय संघाने महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. गेल्यावेळी भारतीय संघाला अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो संघ रविवारी १३ सप्टेंबरला जेतेपदातासाठी भारतीय संघाचा सामना करणार आहे.