BCCI Announces India Squad for T20 World Cup 2026: महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुरूषांच्या टी-२० विश्वचषकानंतर यंदा महिला टी-२० विश्वचषक २०२६ यंदा खेळवला जाणार आहे. यंदाचा महिला वर्ल्डकप इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. २०२५ मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वनडे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. यानंतर आता महिला टी-२० विश्वचषक जिंकण्यावर टीम इंडियाच्या नजरा आहेत. अनेकदा विजयाच्या उंबरठ्यावर येत जेतेपदापासून एक पाऊल दूर राहिल्यानंतर आता हा विश्वचषक मायदेशी आणण्याचं ध्येय हरमन आणि संघाचं असणार आहे.
१४ जून ते ५ जुलै यादरम्यान टी-२० विश्वचषक २०२६ खेळवला जाणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाचं संघ इंग्लंड आणि वेल्समधील टी-२० विश्वचषक खेळणार आहे. स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असणार आहे. तर यस्तिका भाटिया व ऋचा घोष या विकेटकिपर असतील. यस्तिका भाटिया फिट झाल्यामुळे ती दोन जबाबदाऱ्या एकावेळी पार पाडू शकते, यानुसार प्रतिका रावलच्या जागी तिची निवड करण्यात आली आहे. यानंतर स्मृती मानधनासह शफाली वर्मा सलामीला उतरेल यानंतर मधल्या फळीत जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष, भारती फुलमाली या फलंदाज असतील.
अष्टपैलू खेळाडू आणि वनडे विश्वचषक २०२५ मध्ये संघाची मॅचविनर ठरलेल्या अमनजोत कौरला दुखापत झाल्याने तिच्या रूपात संघाला मोठा फटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेसाठी अमनजोत कौरची बदली खेळाडू म्हणून काश्वी गौतमची निवड करण्यात आली होती, पण दुर्देवाने काश्वीलाही दुखापत झाली आहे, त्यामुळे तिची निवड करण्यात आली नाही. या दोघींशिवाय अष्टपैलू खेळाडू राधा यादव हिची संघात निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला ४-१ ने पराभव पत्करावा लागला. यानंतर गोलंदाजी विभागाला अधिक भक्कम करण्याच्या विचाराने संघनिवड करण्यात आली. काश्वी गौतम व अमनजोत कौर या वेगवान गोलंदाजदेखील होत्या. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत वुमन्स प्रीमियर लीग २०२६ मध्ये अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेणाऱ्या नंदिनी शर्माला संधी देण्यात आली आहे. नंदिनीची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली असून थेट टी-२० विश्वचषकात तिला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अरूंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड या वेगवान गोलंदाज आहेत. तर श्रीचरणी, श्रेयंका पाटील, शफाली वर्मा व राधा यादव या अष्टपैलू खेळाडू आहेत.
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रोड्रीग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), श्री चरणी, नंदिनी शर्मा, अरूंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव
