IND-W vs AUS-W Test Squad: भारताचा पुरूष संघ कसोटी क्रिकेटपासून दूर असताना आता टीम इंडियाच्या चाहत्यांना महिला संघाचा कसोटी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान दो्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळवली जाणार आहे. यामधील कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळतील. या दोन मालिकांनंतर, दौऱ्याचा शेवट पर्थमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याने होईल. ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर होणारी ही मालिका ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहे. एलिसाने काही दिवसांपूर्वीच भारताविरूद्धची मालिका खेळत निवृत्त होणार असल्याचं सांगितलं.
७ ते ९ मार्च २०२६ दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. तर सलामीवीर शफाली वर्मानेही तिच्या अलीकडील चांगल्या फॉर्ममुळे संघात स्थान मिळवलं आहे. या दौऱ्यासाठी पहिल्यांदाच काही खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळालं आहे, ज्यात प्रतिका रावलचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान तिला दुखापत झाली होती, ज्यामुळे ती उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत खेळू शकली नाही.
प्रतिका रावल वुमन्स प्रीमियर लीगमध्ये देखील खेळत नाहीये आणि याचबरोबर ती ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० व वनडे मालिकेतूनही बाहेर झाली आहे. पण कसोटी संघात मात्र तिची निवड करण्यात आली आहे. प्रतिका व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या तीन तरुण खेळाडूंना कसोटी संघात संधी मिळाली आहे. त्यात अष्टपैलू अमनजोत कौर आणि तरुण वेगवान गोलंदाज क्रांती गौड यांचा समावेश आहे.
क्रांती व अमनजोत कौर एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपात चांगली कामगिरी करत आहेत आणि संघाच्या विश्वचषक विजयात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या २० वर्षीय डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मालाही कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेसाठी भारतीय महिला अ संघाचीही घोषणा केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या काही खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये सर्वात अनुभवी डावखुरी फिरकीपटू राधा यादव आहे, तिला संघाचा कर्णधार देखील बनवण्यात आले आहे.
भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीसाठी संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायला सतघरे
रायझिंग आशिया चषक २०२६ साठी भारताचा अ महिला संघ
राधा यादव (कर्णधार), हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दिया यादव (फिटनेस), तेजल हसनबीस, नंदनी कश्यप (यष्टीरक्षक), ममता एम (यष्टीरक्षक), सोनिया मेंढिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकोर, जिंतमणि कलीता, नंदनी शर्मा
