IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेत भारताने दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर तब्बल सात गडी राखून विजय मिळवला. आजच्या विजयाने भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी केशव महाराज सांभाळत आहे. श्रेयस अय्यरने विजयी धाव काढत सामना भारताच्या नावावर केला. त्यालाच सामनावीराचा किताब देण्यात आला.

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात देखील निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवनने फक्त १३ धावा केल्या. सलामीवीर शुबमन गिल आणि धवन बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये तब्बल दीडशतकी भागीदारी झाली. त्यांच्यात १६१ धावांची भागीदारी झाली. ईशानचे शतक सात धावांनी हुकले. मात्र श्रेयस अय्यरने आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्याने १११ चेंडूत ११३ धावांची दमदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आज फार चांगली झाली नाही. दव जास्त पडल्याने आफ्रिकन गोलंदाजांना चेंडू फेकण्यात अडचणी येत होत्या. वेगवान गोलंदाज ब्योर्न फॉर्च्युइन, वेन पारनेल आणि कगिसो रबाडा या तिघांनी मिळून १– १ गडी बाद केला. फिरकीपटू मात्र अपयशी ठरले.

तत्पूर्वी,केशव महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डिकॉक (५) आणि मलान (२५) स्वस्तात माघारी परतले. दरम्यान, एडेन मार्कराम आणि रीजा हेंड्रिक्सने भारताविरूद्ध मोठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. हेंड्रिक्सने आक्रमक रूप धारण करत पहिल्यांदा अर्धशतकी मजल मारली. त्यानंतर मार्करामने आपले अर्धशतक पूर्ण करत तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका २७८ धावांपर्यंत मजल मारू शकली.

हेही वाचा :  IND vs SA 2nd ODI: मिलरला धावबाद करण्याच्या नादात सिराज भिडला पंचांशी अन.., नेमका किस्सा काय वाचा 

मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी करत १० षटकात १ निर्धाव आणि ३८ धावा देत ३ गडी बाद केले. आफ्रिकेला शेवटच्या षटकात लगाम घालण्यास सिराज महत्त्वाचा ठरला. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील तिसऱ्या गड्यासाठी १२९ चेंडूत १२९ धावांची शानदार भागीदारी रचली होती. मोहम्मद सिराजला अखेर ही जोडी फोडण्यात यश आले.  त्याने हेंड्रिक्सला ७४ धावांवर बाद केले. कुलदीपने क्लासेनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेला वॉशिंग्टन सुंदरने एडेन माक्ररमला बाद केले.  त्याने ८९ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यानंतर डेव्हिड मिलर आणि पार्नेल खेळपट्टीवर आले. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकात टिच्चून मारा करत या दोघांना हात उघडण्याची संधी दिली नाही. शार्दुल ठाकूरने वेन पार्नेलला १६ धावांवर बाद करत आफ्रिकेला सहावा धक्का दिला. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत आफ्रिकेला शेवटच्या षटकात लगाम घालण्यास मदत केली. शेवटच्या षटकातील गोलंदाजीने भारत सामन्यात परत आला.