scorecardresearch

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : कर्णधार राहुलच्या कामगिरीकडे लक्ष; आज झिम्बाब्वेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना

एकीकडे ५० षटकांच्या क्रिकेटची लोकप्रियता ओसरत असताना आपल्या अस्तित्वासाठी लढा सुरू आहे.

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : कर्णधार राहुलच्या कामगिरीकडे लक्ष; आज झिम्बाब्वेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना
फोटो सौजन्य – ट्विटर

पीटीआय, हरारे : एकीकडे ५० षटकांच्या क्रिकेटची लोकप्रियता ओसरत असताना आपल्या अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. दुसरीकडे, भारतीय संघाच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून, या मालिकेत कर्णधार केएल राहुलची कामगिरी आणि तंदुरुस्ती याकडे सर्वाचे लक्ष असेल.

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक  स्पर्धेसाठी भारताची आघाडीच्या फळीत स्थान मिळवण्यासाठी राहुलला या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत उत्तम संधी मिळेल. शस्त्रक्रियेतून सावरलेल्या राहुलला या मालिकेनंतर आशिया चषक स्पर्धेत कामगिरी दाखवण्याची आणखी एक संधी असेल. या स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानविरुद्ध आहे. फलंदाजीचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर झिम्बाब्वेने बांगलादेशचे ३००हून अधिक धावांचे आणि २९० धावांचे लक्ष्य सलग दोन सामन्यांत सहज पेलले होते.

राहुल त्रिपाठीला संधी?

राहुल, शिखर धवन, शुभमन गिल, दीपक हुडा आणि संजू सॅमसन ही भारताची फलंदाजीची क्रमवारी असेल. महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीलाही आपला खेळ दाखवण्याची नामी संधी या मालिकेत असेल. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, दीपक चहर, कुलदीप यादव या गोलंदाजांशिवाय शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल ही अष्टपैलूंची कुवत भारताकडे आहे. मात्र सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करणारा चहर आणि यादव भारतीय संघातील स्थान टिकवण्याचा प्रयत्न करतील. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमारने चहरची जागा घेतली असली तरी चहर लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

रझा, चकाब्वावर भिस्त

झिम्बाब्वेच्या फलंदाजीची धुरा सिकंदर रझा, रेगीस चकाब्वा आणि इनोसंट काया यांच्यावर असेल. बांगलादेशविरुद्धच्या २-१ अशा मालिका विजयामुळे झिम्बाब्वेचा आत्मविश्वास उंचावला आहे. झिम्बाब्वेला आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ही मालिका भारत खेळत आहे.

संघ

भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.

  झिम्बाब्वे : रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.

  • वेळ : दुपारी १२.४५ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३, ४

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.