पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत रणनीतीत बदल करण्याचे भारतीय संघाने ठरवले आहे. राहुलने नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेच्या संघात जिमी अँडरसन किंवा जोश हॅझलवूडच्या तोडीचे वेगवान गोलंदाज नसले तरी उसळत्या खेळपट्टीवर फलंदाजांचा कस लागेल. सुरुवातीच्या तासाभराच्या खेळात फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरते. याचप्रमाणे दुसऱ्या डावात गोलंदाजांना खेळपट्टीकडून पुरेशी साथ मिळते, असे पहिल्या सामन्यानंतर दीपक चहरने म्हटले होते. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत शाहीन शाह आफ्रिदीला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय फलंदाजांना यानिमित्ताने उत्तम सराव मिळू शकेल.

खेळ सुधारण्याची गरज

पहिल्या सामन्यातील झिम्बाब्वेच्या डावात कर्णधार रेगिस चकाब्वा (३५), ब्रॅड इव्हान्स (नाबाद ३३) आणि रिचर्ड एन्गरव्हा (३४) यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. गोलंदाजीत  झिम्बाब्वेला एकाही फलंदाजाला बाद करता आले नव्हते. त्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना पहिल्या सामन्यातून धडा घेत खेळ सुधारावा लागणार आहे.

फलंदाजीत प्रयोगाची संधी

पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी नाबाद अर्धशतके झळकावत १० गडी राखून भारताचा विजयाध्याय लिहिला. इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर, तर राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार होता. झिम्बाब्वेची गोलंदाजी ही देशातील अव्वल स्थानिक संघाच्या क्षमतेची नसल्यामुळे राहुलला फलंदाजीत प्रयोग करण्याची संधी असेल. धवनला झालेली दुखापत गंभीर असल्यास इशान आणि राहुल या डाव्या-उजव्या जोडीचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. दीपक हुडालाही फलंदाजीत प्राधान्यक्रम दिल्यास त्याचा आत्मविश्वास उंचावू शकेल. संजू सॅमसनकडेही डावाला आकार देण्याची क्षमता आहे. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर अखेरच्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी देण्याची भूमिका प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आखली असावी.

चहर-कृष्णावर भिस्त

वेगवान गोलंदाज चहरने सात षटके गोलंदाजी करीत तीन बळी घेत पुनरागमनाचा इशारा दिला आहे. प्रसिध कृष्णानेही तीन बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. मोहम्मद सिराजने टिच्चून गोलंदाजी केली, पण त्याला अपेक्षित बळी मिळवता आले नाहीत. अक्षर पटेलने प्रभावी फिरकी गोलंदाजी करीत ७.३-२-२४-३ असे लक्षवेधी पृथक्करण राखले.

  • वेळ : दुपारी १२.४५ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३ (एचडी वाहिन्यांसह)