पीटीआय, हरारे : जवळपास सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरच्या (३/२७) भेदक माऱ्यानंतर शुभमन गिल आणि शिखर धवन यांनी साकारलेल्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर भारताने गुरुवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १० गडी आणि ११५ चेंडू राखून धुव्वा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने दिलेले १९० धावांचे आव्हान भारताने ३०.५ षटकांतच पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. अनुभवी धवन आणि युवा गिल या सलामीच्या जोडीने अप्रतिम फलंदाजी केली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना त्यांना फारसे अडचणीत टाकता आले नाही. उपकर्णधार धवनने संयमाने फलंदाजी करताना ११३ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद ८१ धावांची खेळी केली. दुसरीकडे गिलने आक्रमक शैलीत खेळ करताना ७२ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने नाबाद ८२ धावा फटकावल्या. धवन आणि गिल या दोघांचेही हे गेल्या चार सामन्यांतील तिसरे अर्धशतक ठरले.

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतींशी झगडणाऱ्या चहरला सुरुवातीला लय सापडण्यासाठी वेळ लागला. मात्र त्यानंतर त्याने स्विंगचा उत्कृष्ट वापर करत सलग तीन षटकांत इनोसेन्ट काया (४ धावा), तादिवानाशे मारुमनी (८) आणि वेस्ली मधेव्हेरे (५) या झिम्बाब्वेच्या अव्वल तीन फलंदाजांना माघारी पाठवले. तसेच मोहम्मद सिराजने सीन विल्यम्सला (१) बाद केल्याने झिम्बाब्वेची ४ बाद ३१ अशी स्थिती झाली. यानंतरही झिम्बाब्वेने ठरावीक अंतराने गडी गमावले. कर्णधार रेगिस चक्बावासह (३५) तळाच्या ब्रॅड एव्हान्स (नाबाद ३३) आणि रिचर्ड एन्गरावा (३४) यांनी भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. मात्र त्यांना इतरांची फारशी साथ न लाभल्याने झिम्बाब्वेचा डाव ४०.३ षटकांत १८९ धावांत आटोपला. भारताकडून चहरसह अक्षर पटेल आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

झिम्बाब्वे : ४०.३ षटकांत सर्वबाद १८९ (रेगिस चक्बावा ३५, रिचर्ड एन्गरावा ३४; अक्षर पटेल ३/२४, दीपक चहर ३/२७, प्रसिध कृष्णा ३/५०) पराभूत वि. भारत : ३०.५ षटकांत बिनबाद १९२ (शुभमन गिल नाबाद ८२, शिखर धवन नाबाद ८१)

  • सामनावीर : दीपक चहर

एकदिवसीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा हा सलग १३वा विजय ठरला. त्यांनी अखेरचा सामना २०१० मध्ये गमावला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India zimbabwe odi series india victory brilliant performance chahar dhawan gill ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST