मयांक अगरवालचे द्विशतक, पृथ्वी शॉचीही शतकाला गवसणी

मयांक अगरवालने सुरेख फॉर्म कायम राखताना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावले. त्याला महाराष्ट्राच्या पृथ्वी शॉ यानेही शतक ठोकत सुयोग्य साथ दिली. या दोघांच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ४११ धावांपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मयांक २२० आणि कर्णधार श्रेयस अय्यर ९ धावांवर खेळत होते.

स्थानिक खेळाडू मयांकने २५० चेंडूंत ३१ चौकार व ४ षटकारांसह २२० धावा केल्या. त्याचे हे आठवे प्रथम श्रेणी शतक ठरले. त्याने पृथ्वीसह पहिल्या विकेटसाठी २७७ धावांची भागीदारी रचली. पृथ्वीनेही १९६ चेंडूंत २० चौकार व एका षटकारासह १३६ धावा करताना आफ्रिकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. पृथ्वी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रवीकुमार समर्थने ३७ धावांचे योगदान दिले.

त्याआधी, शनिवारच्या ८ बाद २४६ धावांवरून पुढे खेळताना आफ्रिकेचा डाव २४६ धावांवरच संपुष्टात आला. मोहम्मद सिराजने संघासाठी सर्वाधिक पाच बळी मिळविले, तर रजनीश गुरबानी व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : ८८.३ षटकांत सर्वबाद २४६ (रुडी सेकंड ९४, सॅरेल एव्‍‌र्हिन ४७; मोहम्मद सिराज ५/५६)

भारत ‘अ’ (पहिला डाव) : ८७ षटकांत २ बाद ४११ (मयांक अगरवाल २२०*, पृथ्वी शॉ १३६; डुए ओलिव्हर १/६९).=========