भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीनं ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने व्हिक्टर लिलोव्हला पराभूत करत ज्युनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. समीरने व्हिक्टरचा ७-५, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामना १ तास २२ मिनिटं चालला. हा किताब जिंकत समीर रॉजर फेडरर, स्टीफन एडबर्ग, माँफिल्स या सारख्या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. फेडरर, एडबर्ग यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विम्बलडन ज्युनिअरचा किताब जिंकून केली होती.

यापूर्वी फ्रेंच ओपन स्पर्धेत समीर बॅनर्जी पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. मात्र विम्बलडन स्पर्धेत त्याने जोरदार कमबॅक केलं. पहिला सेट जिंकण्यासाठी त्याला चांगलाच घाम गाळावा लागला. मात्र दुसरा सेट त्याने सहज जिंकला. समीर ६ वर्षांचा असल्यापासून टेनिस खेळत आहे. समीरचे आई-वडील १९८०च्या दशकात अमेरिकेत वास्तव्यास गेले होते.

“हा एक अद्भुत अनुभव होता. इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर मी खेळलो. मला प्रेक्षकांकडून दाद मिळत होती. हे क्षण कायम माझ्या स्मरणात राहतील.” असं समीर बॅनर्जीनं सांगितले.

ग्रँडस्लॅम जिंकणारे भारतीय खेळाडू

युकी भांबरीने २००९ साली ज्युनिअर एकेरी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. ज्युनिअर ग्रँडस्लॅम जिंकणारा तो शेवटचा भारतीय खेळाडू होता. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं जेतेपदही पटकावलं होतं. तर हरयाणाच्या सुमित नागलने २०१५ साली व्हिएतनामच्या ली होआंग सोबत दुहेरीत विम्बल्डन जेतेपद पटकावलं होतं. १९५४ साली रामनाथन कृष्णन ज्यूनिअर विम्बलडन स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने १९९०मध्ये ज्युनिअर विम्बलडन आणि ज्युनिअर यूएस ओपनचा किताब जिंकला होता.