राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पूर्ण दैनंदिन भत्ता लवकरच दिला जाईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनवाल यांनी येथे सांगितले.
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंना २५ डॉलर्सऐवजी ५० डॉलर्स (तीन हजार रुपये) दैनंदिन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संघातील स्क्वॉशच्या खेळाडूंना अद्याप हा भत्ता मिळालेला नाही, तर टेबल टेनिसच्या खेळाडूंना निम्मीच रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे संघातील अनेक खेळाडूंनी थेट क्रीडामंत्र्यांकडेच संपर्क साधून हा भत्ता देण्याची विनंती केली होती.  
या संदर्भात सोनवाल म्हणाले की, खेळाडूंना भत्ता देण्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडे (आयओए) आहे. ग्लासगो येथे त्यांचे खाते नसल्यामुळे खेळाडूंना द्यायची रक्कम अदा करताना अडचणी आल्या होत्या. मी स्वत: आयओएच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. खेळाडूंना वाढीव भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीबाबत मी क्रीडा सचिव अजित शरण यांच्याशी चर्चा केली आहे व लगेच ही रक्कम खेळाडूंना द्यावी अशी सूचना केली
आहे.
राष्ट्रकुल पदकवीरांचे लोकसभेकडून अभिनंदन
राष्ट्रकुल स्पर्धेत पदकविजेत्या सर्व खेळाडूंचे लोकसभेतर्फे अभिनंदन करण्यात आले. ग्लासगो, स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन, अशा शब्दांत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पदकविजेत्यांची प्रशंसा केली. संजीता खुमकचान, सुखेन डे, सतीश शिवलिंगम या वेटलिफ्टिंगपटूंचे, तसेच अभिनव बिंद्रा, अपूर्वी चंडेला, जितू राय आणि राही सरनोबत या नेमबाजीत सुवर्णपदक विजेत्या आणि अमित कुमार, सुशील कुमार आणि विनेश फोगट या कुस्तीत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या खेळाडूंचे लोकसभेतर्फे अभिनंदन. देशासाठी रौप्य तसेच कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या अन्य खेळाडूंचेही सभागृहातर्फे अभिनंदन करण्यात आले.