वृत्तसंस्था, पतियाळा : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सध्या वेगळाच सराव करत आहेत. मैदानावरील आपल्या कौशल्याच्या सरावाबरोबरच, जपानमध्ये गेल्यावर त्यांच्या वाट्याला राहण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आल्यास त्याच्याशी जुळवून घेण्याची सवयही सध्या खेळाडू करून घेत आहेत.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) अजब मोहिम राबवली आहे. यासाठी पतियाळा आणि बंगळूरु येथील ‘साइ’च्या केंद्रांमध्ये मालवाहू ‘कंटेनर’सारख्या छोट्या निवासकक्षांची उभारणी करण्यात आली आहे. खेळाडूंना त्यात रात्र घालवावी लागत आहे. तेथे पलंग सहा फुटांपेक्षा थोडा लांब आहे, भिंती अगदी जवळ आहेत आणि अत्यंत गरजेच्या गोष्टींशिवाय इतर कशासाठीही तिथे फारशी जाग नाही. जपानमधील निवासव्यवस्था साधारण अशीच असल्याने खेळाडूंना अनोळखी गोष्टींची आधीच ओळख करून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे ‘साइ’च्या वतीने सांगण्यात आले.

खेळाडू आलटून-पालटून या कंटेनरमध्ये एक रात्र घालवत आहेत आणि दुसर्या दिवशी सकाळी उठून त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमाचे पालन करत सरावासाठी जात आहेत. दोन वर्षांपूर्वीच आशियाई खेळांमधील निवासव्यवस्था पारंपारिक क्रीडाग्रामऐवजी कंटेनर आणि क्रूझ अशा वेगळ्या स्वरूपात असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

नेहमी प्रशस्त खोल्या आणि आपल्या साहित्यासाठी स्वतंत्र जागेची सवय असलेल्या खेळाडूंना या लहान जागेत जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मात्र, दोन वेळचा आशियाई खेळांचा सुवर्णपदक विजेता गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंग तूर याच्या मते, ही आधीच केलेली तयारी मोठा फरक घडवू शकते. ‘साइ’ आणि क्रीडा मंत्रालयाच्या पथकाने जपानचा दौरा केल्यावर त्यांना परिस्थितीची कल्पना आली. त्यानुसार खेळाडूंच्या मुक्कामाचे वेळापत्रक तयार करण्यात आले.

मर्यादित जागेचा वापर : ‘साइ’ने या मर्यादित जागेचा वापर अत्यंत कार्यक्षमतेने केला आहे. साधारण १३ मीटर लांब आणि ३ मीटर रुंद असलेल्या या कंटेनरच्या दोन्ही टोकांना दोन जणांसाठी बेडरूम्स आहेत. त्या एका अरुंद मध्यवर्ती मार्गाने जोडलेल्या आहेत. यात दोन वातानुकूलन यंत्र (एसी), वॉशिंग मशीनसह एक लहान लाँड्री एरिया, फ्रिज व सिंक असलेले छोटे स्वयंपाकघर आहे. बाथरूममध्ये वॉश बेसिन, शौचालय आणि आंघोळीसाठी स्वतंत्र जागा आहेत. कपडे आणि साहित्य ठेवण्यासाठी चार कपाटे व बेडच्या खाली पुरेशी जागा आहे.